Madha Loksabha : माढा लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला असला, तरी महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार याची चर्चा अजूनही सुरूच आहे. माढा लोकसभेला महाविकास आघाडीकडून शरद पवार (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) यांच्या वाट्याला ही जागा आली आहे. मात्र, शरद पवार गटाकडून (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) अजूनही उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. पहिल्यांदा या मतदारसंघातून महादेव जानकर यांच्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर सुद्धा केली होती. मात्र, जानकर यांना महायुतीने आपल्या गळाला लावून त्यांना परभणीच्या रिंगणातून उतरवलं आहे. त्यामुळे आता माढामधून कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरूच आहे. 


भाजपमधील नाराज गट असलेल्या मोहिते पाटील गटाकडून पण माढा लोकसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी गुप्तपणे शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. उभय नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाली झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. 


जगताप यांनी सांगितले की, माढा लोकसभेला अजूनही उमेदवार अंतिम करण्यात आलेला नाही. शरद पवार यांची धैर्यशील मोहिते पाटील यांनी यांनी भेट घेतली आहे. मात्र, त्यांची उमेदवारी अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. आमच्या सोबत चर्चा केल्यानंतर आता हा विषय संसदीय बोर्डामध्ये मांडण्यात येईल. त्यानंतर कोण उमेदवार असेल हे निश्चित करण्यात येईल. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका जगताप यांनी मांडली. 


दरम्यान स्वतःच्या उमेदवारीवर बोलताना जगताप यांनी सांगितले की, मला खासदारकीसाठी संधी का मिळावी याची कारणे मी शरद पवारांसमोर मांडली आहेत. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही. प्रामुख्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकता येण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजची निर्मिती हे माझं लक्ष असणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. 


माढासाठी प्रवीण गायकवाड सुद्धा इच्छूक


दरम्यान, माढा लोकसभेसाठी प्रवीण गायकवाड यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की जानकार यांच्या यूटर्न मुळे उमेदवार द्यायचा की नाही याबाबत चर्चा सुरू होती. मी माढ्यातून लढण्यासाठी अनेकांनी आग्रह केला आहे. माढामधून इच्छूक असल्याने शरद पवारांची दिल्लीत, मुंबईत भेट घेतल्याचे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या