भंडारा : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) अनुषंगाने राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपांचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. असे असतानाचं अनेक ठिकाणी जागावाटपामध्ये रस्सीखेच आणि नाराजीनाट्य रंगताना दिसत आहे. दरम्यान, भंडाऱ्यातील (Bhandara) महाविकास आघाडीतही कार्यकर्त्यांमध्ये तुमसरच्या जागेवरून प्रचंड नाराजी बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीची भंडाऱ्याच्या तुमसरची जागा कोणत्या पक्षाला जाईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नसतानाचं भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलाय. यानंतर ते तुतारी चिन्हावर उभे राहतील आणि त्यांनाचं महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेलं, असा दावा चरण वाघमारे यांनी केलाय. 


दरम्यान, पक्षाच्या जडणघडणमध्ये कोणतीही भूमिका नसणाऱ्या आणि आयात केलेल्या चरण वाघमारे यांना निवडणुकीत पक्षानं उमेदवारी देऊ नये, यावरून आता भंडाऱ्याच्या तुमसरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ज्यांनी पक्षासाठी अहोरात्र काम केलं अशाना डावलून ऐनं वेळेवर निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश करणाऱ्या वाघमारे यांना तिकीट देऊ नये, ही मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लावून धरली आहे.


...अन्यथा सामूहिक राजीनामा देत भंडाऱ्यात सांगली पॅटर्नचा इशारा 


याबाबत काल शुक्रवारच्या रात्री भंडाऱ्याच्या तुमसर येथे कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि यात एक मुखानं चरण वाघमारे यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध करण्यात आला. याबाबत दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे स्थानिक नेते मुंबईला जाऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन चरण वाघमारे यांना उमेदवारी देवू नये, ही भावना व्यक्त केली. पक्षश्रेष्ठींनी शब्द दिल्यानं सर्व पदाधिकारी तुमसरला परतलेत. काल याबाबत सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली, यात वाघमारे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविणारा सुर उमटला. पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन वाघमारेंना उमेदवारी देऊ नये, अन्यथा सामूहिक राजीनामा देत भंडाऱ्यात सांगली पॅटर्न राबविण्याचा इशारा, यावेळी कार्यकर्त्यांनी दिला आहे.


महाविकास आघाडीतील असंतुष्ट पदाधिकाऱ्यांचा मेळावा


महाविकास आघाडीतील धुसफूस आता भंडाऱ्यातही दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलेल्या भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांना तुमसर येथून उमेदवारी देऊ नये, याकरिता महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांनी आता वज्रमूठ बांधली आहे. महाविकास आघाडीच्या भंडारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबईत काँग्रेस आणि शरद पवार पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. तुमसर येथील एका सभागृहात महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीत खरी महाविकास आघाडी च्या नावावर एक प्रकारे शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळं आता तुमसरातील राजकीय वातावरणानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होईल का? अशीच चर्चा सुरू झालीय.


हे ही वाचा