नवी दिल्ली : महायुतीत जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महायुतीतील प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणूनच या तिन्ही पक्षांत जागांच्या मुद्द्यावरून कोणताही ठोस तोडगा निघत नाही. दरम्यान, शुक्रवारी (19 ऑक्टोबर) दिल्लीत झालेल्या बैठकीत महायुतीतील जागावाटपाचा (Mahayuti Seat Sharing) मुद्दा निकाली लागल्याचे म्हटले जात आहे. आता मोजक्याच जागांचा प्रश्न असून लवकरच त्या जागांचेही वाटप होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीतील ही बैठक पार पडली. 


रात्री अडीच तास चालली बैठक 


महाराष्ट्र विधानसभेचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दिल्लीमध्ये गेले होते. या तिन्ही नेत्यांची अमित शाहा यांच्यासोबत रात्री उशिरा एक बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा झाली. ज्या जागांवर वाद चालू होता, तो सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये महायुतीला बऱ्यापैकी यश आल्याचे म्हटले जात आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी पार पडलेली ही बैठक एकूण अडीच तास चालली. जागावाटपाचा तिढा अमित शाह यांच्या समक्ष सोडवण्यात आला असून आता फक्त काहीच जागांचा प्रश्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  


कोणत्या पक्षाला किती जागा हव्यात?


महायुतीचे भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाला 288 जागांपैकी कमीत कमी 150 जागा हव्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 87 ते 90 जागा हव्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कमीत कमी 60 जागा हव्या आहेत. असे असताना जागावाटपाची ही चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  


बंडखोरी रोखण्याचे आव्हान


 महायुतीत एकीकडे जागावाटपावर चर्चा चालू आहे. मात्र महायुतीतील तिन्ही पक्षांपुढे अंतर्गत बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कारण बऱ्याच मतदारसंघांसाठी महायुतीत एकापेक्षा जास्त नेते इच्छुक आहे. या नेत्यांची त्या-त्या मतदारसंघांत तयारीदेखील चालू आहे. त्यामुळे एका पक्षाला जागा सुटल्यास दुसऱ्या पक्षातील नेत बंड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाल्यास बंड शांत करण्याचे आव्हान महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांपुढे असणार आहे. 


हेही वाचा :


न्यू राष्ट्रीय समाज पक्ष निवडणुकीच्या मैदानात, महादेव जानकरांच्या अडचणी वाढणार, पिपाणी चिन्हाचा आग्रह, शरद पवार गटासाठी अडचण


NCP Candidate list : बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर


शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हात बदल झाला की नाही? ठाकरे गटाच्या वकिलांनी दिलं स्पष्टीकरण