मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरु असलेल्या लोकसभा जागावाटपाच्या चर्चेत एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटात अद्याप लोकसभेच्या काही जागांवरील उमेदवारीवरुन मतभेद आहेत. वर्षा बंगल्यावर रात्रीची खलबतं केल्यानंतरही हा तिढा काही केल्या सुटायला तयार नाही. त्यामुळे आता शिंदे गटाकडून काही धक्कादायक आणि अनपेक्षित असे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार शिंदे गटान आतापर्यंत घोषणा केलेले लोकसभेचे उमेदवारही बदलले जाऊ शकतात. यामध्ये हिंगोलीतून (Hingoli Loksabha) उमेदवारी देण्यात आलेल्या हेमंत पाटील (Hemant Patil) यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर भाजपचे स्थानिक नेते प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी मुंबई ठाण मांडून हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे आता शिंदे गटाकडून (Shinde Camp) हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते. 


गेल्या काही दिवसांपासून हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की शिंदे गटावर ओढावणार, याची जोरदार चर्चा आहे. मात्र, यापेक्षा एक मोठा ट्विस्ट हिंगोलीच्या राजकारणात पाहायला मिळू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या विरोधानंतर एकनाथ शिंदे हे हिंगोलीतून हेमंत पाटील यांना माघार घ्यायला सांगतील. पण हेमंत पाटील यांच्याऐवजी त्यांची पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल. यवतमाळ-वाशिम हा शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचा मतदारसंघ आहे. भावना गवळी या यवतमाळ-वाशिममधून सलग पाचवेळा निवडून आल्या आहेत. मात्र, त्यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या कलंकामुळे भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. आतापर्यंत भावना गवळी यांच्याऐवजी शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, आता शेवटच्या क्षणी यवतमाळ-वाशीम मतदारसंघासाठी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचे नाव पुढे आले आहे. हा महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट ठरु शकतो. 


फडणवीसांच्या घरी २५ मिनिटं चर्चा, बाहेर पडल्यानंतर भावना गवळी यांचा नूरच बदलला


भावना गवळी या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर येऊन मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी भावना गवळी यांनी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे घर गाठले होते. फडणवीसांच्या घरात जाण्यापूर्वी भावना गवळी या उत्साहात दिसत होत्या. मी आतमधून चर्चा करुन आल्यानंतर तुमच्याशी बोलेन, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. परंतु, 25 मिनिटांच्या भेटीनंतर बाहेर पडल्यानंतर भावना गवळी यांचा नूर पूर्णपणे बदलला होता. गवळी यांनी आपली गाडी देवेंद्र फडणवीस यांच्या अंगणात मागवून घेतली आणि तिथूनच त्या गाडीत बसून निघून गेल्या होत्या. तेव्हापासूनच यवतमाळ-वाशीममधून भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चेने जोर धरला होता. अशातच आता यवतमाळ-वाशीम लोकसभेसाठी राजश्री पाटील यांचे नाव समोर आल्याने पुढे काय घडणार, हे पाहावे लागेल. 


आणखी वाचा


हेमंत पाटील, धैर्यशील मानेंसह शिंदेंच्या पाच जागा धोक्यात? भाजपचा विरोध कायम, जागा पडणार की पाडणार?