नवी दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) चालू आहे. या वेळी खासदारांची संख्या वाढल्यामुळे काँग्रेस तसेच विरोधकांची ताकद वाढली आहे. लोकसभेत विरोधक अधिक आक्रमक दिसत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याने काँग्रेसलाही (Congress) बळ मिळाले आहे. दरम्यान, आज राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी तुफान भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. अग्नीवीर योजना, शेतकरी आंदोलन, जीएसटी, नोटबंदी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाला घेरले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भाषणात भाजपला ओपन चॅलेंज दिले. आम्ही गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पराभूत करणार, असे राहुल गांधी म्हणाले. 


राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? 


राहुल गांधी लोकसभेत अग्नीवीर, जीएसटी अशा मुद्द्यांवर बोलत होते. राहुल गांधी गुजरातचा संदर्भ देताना सत्ताधारी बाकावरून त्यांना टोकले जात होते. त्यानंतर "मी गुजरातला जात असतो. आम्ही तुम्हाला यावेळी गुजरातमध्ये हरवणार आहोत. तुम्ही हे माझ्याकडून लिहून घ्या. आम्ही इंडिया आघाडी तुम्हाला यावेळी गुजरातच्या निवडणुकीत पराभूत करून दाखवणार आहोत," असे राहुल गांधी म्हणाले. 


लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एका जागेवर विजय


दरम्यान, गुजरात हा भाजपाचा गड मानला जातो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच राज्यातून येतात. त्यामुळे हे राज्य तसे भाजपासाठीही महत्त्वाचे आहे.  या लोकसभा निवडणुकीत गुजरातला संपूर्ण जागांवर विजय मिळवता आलेला नाही. काँग्रेसचा येथे एका जागेवर विजय झाला आहे. त्यामुळे आगामी काळात गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही तुम्हाला पराभूत करून दाखवू, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. त्यामुळे आता गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा :


Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....