Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्र (Maharashtra) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या निवडणूक (Lok Sabha Elections Phase 3) काही दिवसांवर आली आहे. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 11 जागांवर मतदान पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सर्वाधिक मालमत्ता असलेले उमेदवार कोण, हे तुम्हाला माहित आहे का? तिसऱ्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीत भाजप आघाडीवर आहे. सर्वात कमी मालमत्ता असलेल्या उमेदवारांमध्ये तीन अपक्ष उमेदवारांची नावे सामील आहेत.


महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा उमेदवारांपैकी कुणाची संपत्ती सर्वाधिक आणि कुणाची संपत्ती सर्वात कमी याबाबत माहिती जाणून घ्या. 


महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात तीन सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत उदयनराजे भोसले आणि रणजीतसिंह हिंदुराव निंबाळकर यांच्या नावाचा समावेश आहे. तर इरफान अबुतालिब चांद, मनोहर प्रदीप सातपुते आणि अशोक ज्ञानदेव वाघमोडे हे सर्वात कमी मालमत्ता असलेले उमेदवार आहेत.


सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?


लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसने कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांना तिकीट दिलं आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे एकूण 342 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ज्यामध्ये 1,65,77,48,000 रुपयांची जंगम मालमत्ता आणि 1,77,09,20,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.


सातारा लोकसभेचे भाजपचे उमेदवार श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्याकडे तब्बल 223 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्याकडे 20,55,51,392 रुपयांची जंगम आणि 2,02,56,82,547 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.


माढा येथील महायुतीचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह हिंदुराव निंबाळकर सर्वाधिक मालमत्ता असलेल्या उमेदवारांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रणजितसिंह निंबाळकरांकडे 1,81,30,13,580 रुपयांची जंगम आणि 24,52,44,795 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. रणजितसिंह निंबाळकरांकडे एकूण 205 कोटी रुपयांची संपत्ती आहे.


कमी मालमत्ता असलेला उमेदवार कोण?


महाराष्ट्रातील कोल्हापुरातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे इरफान अबुतालिब चांद यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. त्यांच्याकडे अवघ्या 100 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांची एकूण संपत्ती फक्त 100 रुपये आहे.


हातकणंगले लोकसभेचे उमेदवार मनोहर प्रदीप सातपुते हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. सातपुते यांच्याकडे फक्त 2000 रुपयांची जंगम मालमत्ता आहे आणि स्थावर मालमत्ता नाही. मनोहर सातपुते यांची एकूण संपत्ती फक्त 2000 रुपये आहे. त्यामुळे सर्वात कमी संपत्ती असलेल्या उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.


अशोक ज्ञानदेव वाघमोडे हे सर्वात कमी संपत्ती असलेल्या उमेदवारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अशोक ज्ञानदेव वाघमोडे हे अपक्ष उमेदवार  ते माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याकडे केवळ 6 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. एकूण मालमत्ताही फक्त सहा हजार रुपये आहे.