ठाणे : राजकारणाच्या गदारोळात रोज काही ना काही घडताना दिसत आहे. अशातच कल्याणमधून (Kalyan Lok Sabha Election) एक मोठी इंटरेस्टिंग घटना घडल्याचं समोर आलं. मंगळवारी शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण (Shiv Sena Purushottam Chavan) यांनी एकाच दिवसात मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला रामराम केला आणि पुन्हा घरवापसी करत ठाकरे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक कामासाठी गेलो असताना आपला पक्षप्रवेश करून घेतला असल्याचा दावा पुरुषोत्तम चव्हाण यांनी केला. 


भेटीसाठी गेलो आणि झेंडा हातात दिला


पुरुषोत्तम चव्हाण यांनी एकाच दिवसात पुन्हा एकदा ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध असल्याने मी वैयक्तिक कामासाठी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी डोंबिवलीतील काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सुरू होता. त्यामध्ये माझा नंबर लागला. त्यावेळी माझ्या हातात पक्षाचा झेंडा दिला आणि पक्षप्रवेश करून घेतला. त्यावेळी मलाही काही माहिती नव्हतं. 


पुरुषोत्तम चव्हाण पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. मी पहिल्यांदा नगरसेवक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी खूप सहकार्य केलं होतं. 


कल्याणमध्ये मुलं पळवणारी टोळी


पुरूषोत्तम चव्हाण यांनी केलेल्या आरोपानंत कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, मुले पळवणाऱ्या टोळीसारखे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पळविणारी टोळी सध्या कल्याणमध्ये सक्रिय आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सावध राहावे. 


माजी नगरसेवक असलेल्या पुरुषोत्तम चव्हाण यांनी केलेल्या दाव्यानतंर आता शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. 


एक पुरुषोत्तम चव्हाण गेल्याने काय फरक पडणार? 


पुरुषोत्तम चव्हाण यांनी आधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि आज ते कसं काय नाकारत आहेत असा सवाल शिंदे गटाचे विवेक खामकर यांनी केला. त्यांनी केलेले आरोप म्हणजे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र आहे. विवेक खामकर म्हणाले की, एक पुरुषोत्तम चव्हाण गेल्याने काय फरक पडणार आहे? तुम्ही स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला. त्यामुळे अशी दिशाभूल करू नका. पुरुषोत्तम चव्हाण स्वतःहून त्या ठिकाणी आले होते


ही बातमी वाचा :