मुंबई : लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होत असून, उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात देखील झाली आहे. आज मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात (Thane) आणि नाशिकमध्ये (Nashik) उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. उबाठा गटाकडून अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजन विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. तर, दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबईतून महायुतीकडून राहुल शेवाळे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना उबाठा गट आणि शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मात्र हे असे असले तरी मविआ असो किंवा महायुती दोघांनाही काही ठिकाणी अजूनही उमेदवार निश्चित करता आलेला नाही. ज्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार ठरला, त्या ठिकाणी मविआचा उमेदवार ठरला नाही तर, ज्या ठिकाणी मविआला उमेदवार मिळाला त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही.
नेमकं घोडं अडलं कुठे?
दक्षिण मुंबई
उबाठा गटाकडून अरविंद सावंत यांनी अर्ज भरला. मात्र, महायुतीत जागा नेमकी कोणता पक्ष लढणार यावर चर्चा सुरू आहे. एकीकडे शिवसेनेकडून यामिनी जाधव यांचे नाव निश्चित मानले जात असताना भाजपने देखील या मतदार संघावर दावा केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा अजूनही इच्छुक असून, त्यांचा प्रचार अजूनही सुरू आहे.
ठाणे
उबाठा गटाकडून राजन विचारे यांनी आज उमेदवारी अर्ज भरलाय.. तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. ठाण्यातून शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात असेल तरी अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही. तर दुसरीकडे भाजपने देखील अद्याप दावा सोडलेला नाही.
उत्तर मुंबई
महायुतीचे उमेदवार पियूष गोयल हे उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार असून, महाविकास आघाडीत मात्र जागा कुणाला सोडायची आणि उमेदवार कोण यावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी मविआचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही.
उत्तर पश्चिम मुंबई
उबाठा गटाकडून अमोल किर्तीकर यांनी आज पक्षाचा एबी फॉर्म घेतला असून, ते लवकरच आपला उमेदवारी अर्ज भरतील. मात्र दुसरीकडे महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. शिवसेनेने रविंद्र वायकर यांना उमेदवारी देण्याची तयारी केली असली, तरी वायकर यांच्या नावाला मनसे आणि भाजपकडून विरोध होत आहे.
पालघर
उबाठा गटाकडून भारती कामडी याना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी पक्षाचा एबी फॉर्म देखील घेतला मात्र दुसरीकडे महायुतीकडून राजेंद्र गावीत यांना उमेदवारी नेमकी कोणत्या पक्षातून द्यायची हा निर्णय बाकी आहे. राजेंद्र गावित हे भाजपच्या चिन्हावर लढण्यास इच्छुक असून, शिवसेनेने देखील या लोकसभा मतदार संघावर दावा केला.
नाशिक
उबाठा गटाकडून राजाभाऊ वाझे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज भरला आहे. दुसरीकडे महायुतीकडून अद्याप उमेद वार जाहीर होऊ शकलेला नाही. एकीकडे महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नसताना दुसरीकडे शांतीगिरी महाराज यांनी अर्ज भरत नवा ट्विस्ट निर्माण केला आहे.
जागावाटपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलणं टाळलं
दरम्यान, विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना विचारले असता त्यांनी ज्या जागांचा तिढा आहे तो लवकरच सुटेल अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर नाशिकबद्दल आता नाही नंतर बोलतो असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलणं टाळलं आहे. दुसरीकडे दक्षिण मुंबईतून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या अरविंद सावत यांनी महायुतीला माझ्या विरोधात उमेदवार सापडत नसल्याची टीका करत विजय आपलाच असल्याचा दावा केला आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 3 मे
एकूणच काय मविआ असो की, महायुती दोन्ही पक्षांना काही ठिकाणी अद्याप उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 3 मे आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपली उमेदवारी घोषित करावी, असे दोन्ही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना वाटतंय, त्यामुळे पुढच्या 24 तासात तरी हा तिढा सुटेल का हे पाहणं महत्वाचे ठरेल.