Buldhana News: बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी आज एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत म्हटलं आहे की 'राज्यात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत तर बुलढाण्यात काय?' यामुळे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aaghadi) निवडणुकीच्या तोंडावर बुलढाण्यात काँग्रेसची नाराजी समोर आली आहे. महाविकास आघाडी कडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे प्रा. नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांना उमेदवारी जाहीर झाली, मात्र प्रा. खेडेकर यांच्या संपर्कात बुलढाण्यातील काँग्रेसचे नेते नसल्याने बुलढाण्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. त्यात आज हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या ट्विट मुळे ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे तडकाफडकी बुलढाण्यात दाखल झाले असून त्यांनी जिल्ह्याच्या काँग्रेस कार्यालयात काँग्रेस नेत्यांची मनधरणी केल्याची माहिती पुढे आलीय.


बुलढाण्यात महाविकास आघाडीत बिघाडी?


बुलढाण्यात महाविकास आघाडीत कुठलीही बिघाडी नसल्याचं नितीन देशमुख यांनी काँग्रेस कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र हर्षवर्धन सपकाळ यांच्या ट्विटमुळे बुलढाण्यात महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल असल्याचं समोर आलं आहे. नुकतेच माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, 'राज्यात जर मैत्रीपूर्ण लढत होणार असतील आणि पक्षाने मला आदेश दिला तर मी बुलढाण्यात निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीत हर्षवर्धन सपकाळ यांची मनधरणी करण्यात मविआच्या नेत्यांना यश येतं का, की  हर्षवर्धन सपकाळ काही वेगळा निर्णय घेत निवडणूक लढवतात हे पाहणे उत्सकतेचे ठरणार आहे. 


काँग्रेसच्या माजी आमदारच्या एका ट्विटमुळे मोठी खळबळ


शिवसेना पक्षात उभी फुट पडल्यानंतर यंदाची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेना पक्षासाठी अतिशय महत्वाची आणि आव्हानात्मक ठरणार आहे. म्हणूनच शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येक उमेदवार अतिशय तोलून-मापून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. अशातच महाविकास आघाडीमध्ये बुलढाणा मतदारसंघातून शिवसेने नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले प्रतापराव जाधव हे सध्या विद्यमान खासदार आहेत.  त्यामुळे आता त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर हे उभे राहिले आहेत.


या मतदारसंघात नुकतीच महायुती मध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष अर्जूनराव वानखेडे आणि शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे बघायला मिळाले होते. त्यामुळे आता महायुती पाठोपाठ मविआमध्ये देखील असेच काहीसे चित्र उभे ठाकले असल्याचे या निमित्याने स्पष्ट झाले आहे. अशातच आता माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ नेमकी काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या