Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनीही आपल्या इच्छा जाहीरपणे व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे ती, शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीत (National Congress Party) पडलेल्या अंतर्गत फुटीमुळे. अशातच ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) दोघेही आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. 


विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलताना म्हणाले की, "शिवसैनिक असताना पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो मान्य असेल. पक्षप्रमुखांनी सांगितलं लढायचं, तर लढायचं, पक्षप्रमुखांनी सांगितलं नाही लढायचं, तर नाही लढायचं. तसेच, पक्षप्रमुखांनी सांगितलं की, संघटनेचं काम करायचं, तर करायचं. हा आदेश मानणारा मी शिवसैनिक आहे. त्यामुळे आदेश मानणारा मी शिवसैनिक आहे."


केवळ निवडणूक नाही, इतर कोणतीही लढाई लढायला माझी 100 टक्के तयारी : अंबादास दानवे 


"मी शिवसैनिक आहे. पक्षप्रमुख जिथे सांगतील तिथे लढण्याची माझी तयारी आहे. कुठेही लढायला सांगितलं तरी, केवळ निवडणूक नाही, इतर कोणतीही लढाई लढायला सांगितली तरी ती लढाई लढण्याची माझी 100 टक्के तयारी आहे.", असं अंबादास दानवे म्हणाले. तसेच ते पुढे बोलताना जर तुम्हाला संभाजीनगरातून निवडणूक लढवायला सांगितली, तर लढवणार का? यावर बोलताना ते म्हणाले की, "मी मागच्या 10 वर्षांपासून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे."


दानवेंना निवडणूक लढवण्याची इच्छा होती, त्यामुळे गेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला : चंद्रकांत खैरे 


अंबादास दानवेंना निवडणूक लढवण्याची इच्छा होती. त्यामुळे गेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला आहे. असा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते बोलताना म्हणाले की, "इच्छा असली, तर माझी इच्छा मुख्यमंत्री व्हायची आहे. मग याचा अर्थ मी इतरांना पाडायचं आणि त्या पदावर जाऊन बसायचं का? असं नाही. नशीबातही हवं. एकदा मी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भेटलो होतो. त्यावेळी ते म्हणाले की, अरे आपल्या नशीबातही हवं, नशीबात असेल तर मिळतं. आज तुला मला मंत्रिपद द्यायचं नाही, पण असं काही घडून आलं तर मला तुला मंत्रिपद द्यावं लागेल, असं बाळासाहेब म्हणाले होते. नशीबाची गोष्ट असते. .


छत्रपती संभाजीनगरची निवडणूक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील ते लढवणार : चंद्रकांत खैरे 


संभाजीनगरची जागा कोण लढवणार? असा प्रश्न चंद्रकांत खैरेंना विचारल्यावर चंद्रकांत खैरे म्हणाले की, "छत्रपती संभाजीनगरची निवडणूक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील ते लढवणार. होईन ना चांगलं. कशाला काळजी करायची. जनतेची जी इच्छा आहे, ती उद्धव ठाकरे मान्य करतील."