Lok Sabha Election 2024: बिहारमध्ये भाजपाला सोडचिठ्ठी आरजेडीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर नितीश कुमार हे खूपच सक्रिय झाले आहेत. आज नितीश कुमार यांनी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासोबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी सांगितले की, आम्ही दोघेही सोनिया गांधी यांना एकत्र भेटलो. आता एकत्र भाजपला देशातून संपवायचे आहे. दोन्ही नेते म्हणाले की, आम्ही सोनिया गांधीना सर्वांना एकत्र बोलावण्याची विनंती केली आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होऊ द्या. त्यानंतरच आपण सर्वांना एकत्र भेटून बोलावू.


बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर नितीश कुमार आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट आहे. याशिवाय लालू यादवही बऱ्याच कालावधीनंतर 10 जनपथ येथे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा (भाजप) सामना करण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणून लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांची सोनिया गांधी यांच्यासोबतची भेट पाहिली जात आहे. विरोधी पक्षांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी सोनिया गांधींच्या 10 जनपथ येथील निवासस्थानावरील बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे, कारण काँग्रेस आणि काही प्रादेशिक पक्षांमधील मतभेद दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अनेकांना तुरुंगात टाकण्याचे काम भाजपने केले असल्याचं म्हटलं आहे. देशात महागाई, बेरोजगारी आणि गरिबी शिगेला पोहोचली आहे, असं ही ते म्हणाले. नितीश म्हणाले की, आम्ही दोघांनी एकत्र बसून सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. आता आम्हाला देशासाठी एकत्र काम करायचे आहे. तत्पूर्वी, नितीश कुमार यांनी भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, ही विरोधकांची मुख्य आघाडी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणार. दरम्यान, माजी उपपंतप्रधान देवीलाल यांच्या जयंतीनिमित्त इंडियन नॅशनल लोक दलने (INLD)  हरियाणात आयोजित केलेल्या सभेत नितीश कुमार म्हणाले की, सर्व बिगरभाजप पक्ष एकत्र आले तर देश भाजपमुक्त होऊ शकतो. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि इतर अनेक विरोधी पक्ष नेते उपस्थित होते. 

इतर महत्वाच्या बातम्या: 


आयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले! शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित


'गेहलोत कॅम्पचे 65 आमदार पायलट यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही', गेहलोत घेणार पक्ष प्रभारींची भेट