Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. आज देशाचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त हरियाणामध्ये अनेक विरोधी पक्ष नेते एकवटले आहेत. आयएनएलडी पक्षाचे अध्यक्ष ओपी चौटाला यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, एसएडीचे नेते सुखबीर बादल हरियाणामध्ये दाखल झाले आहेत. आयएनएलडीच्या 'सन्मान दिन रॅली'मध्ये सहभागी होण्यासाठी हे नेते पोहोचले आहेत. यावेळी बोलताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला लक्ष करत म्हटलं आहे की, ''सरकारने शेतकरी नेत्यांवरील खटले मागे घेण्याचे आश्वासन दिले, परंतु ते पूर्ण केले नाही.''






रॅलीला संबोधित करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, ओम प्रकाश चौटाला यांना फसवून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. त्यांनीच आम्हाला भाजप सोडण्यास सांगितले, आम्ही त्यांचे म्हणणे ऐकले. गेल्या निवडणुकीत आमच्या उमेदवाराचा पराभव करण्यात त्यांचा सहभाग होता. मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, ते (भाजप) आश्वासन दिल्याप्रमाणे काम करत नव्हते. नितीश कुमार म्हणाले की, बिहारमध्ये 7 पक्ष एकत्र आले आहेत. 2024 मध्ये ते (भाजपला) जिंकू शकत नाही. संपूर्ण देशाला संघटित केले पाहिजे. चौटाला तुम्ही लोकांना जोडायला सुरुवात करा. सर्व प्रकारची लोक जोडा आणि याबाबत आम्ही काँग्रेसलाही विनंती केली आहे. असे झाल्यास 2024 मध्ये त्यांचा पराभव होईल.


यादरम्यान तेजस्वी यादव यांनीही आपल्या भाषणात भाजपवर जोरदार निशाणा साधला. तेजस्वी यादव म्हणाले की, ''आजचा दिवस सन्मान दिन म्हणून साजरा केला जात आहे. आज आपण खुर्चीवर बसलो आहोत, यामध्ये चौधरी देवी लाल यांचे मोठे योगदान आहे. आमच्या वडिलांची तब्येत ठीक नाही, अन्यथा तेही या कार्यक्रमत उपस्थित असते. चौधरी देवीलाल यांनी शेतकऱ्यांना एकत्र केलं, समाजवाद्यांना मजबूत केलं. आज केंद्रात बसलेल्या लोकांना या देशात फक्त भाजप आणि संघ हवा आहे, बाकी सर्व काही संपले पाहिजे, असं त्यांनी वाटत.'' ते म्हणाले की, पंजाबच्या जनतेने शेतकरी आंदोलन करून भाजपला एक चांगला धडा शिकवला.