चंद्रपूर : महाविकास आघाडीच्या (MVA Seat Sharing) जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीत 120 जागांवर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Shivsena UBT),काँग्रेस (Congress) आणि  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांना कोणत्या जागा आता मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर स्थानिक नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी सर्व 6 जागा लढवणार असल्याचं म्हटलं होतं. याला प्रत्युत्तर देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी म्हटलं आहे. 


...तर 288 जागा आम्ही लढवू : किशोरी पेडणेकर 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्त्री शक्ती संवाद यात्रा सुरु करण्यात आलेली आहे. या निमित्तानं मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर चंद्रपूरमध्ये कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर दिलं. 



शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी 288 जागा लढवू असा इशारा काँग्रेसला दिला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व 6 विधानसभा जागा काँग्रेस लढवणार असल्याच्या वक्तव्याचा समाचार घेत पेडणेकर यांनी हा इशारा दिला.  खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या तिकिटासाठी उद्धव ठाकरे यांनी किल्ला लढविल्याची आठवण देखील किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेस नेत्यांना करुन दिली. महायुतीचा भाग असताना चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेला जागा होत्या आणि आता तर मिळाल्याच पाहिजेत अशी आग्रही मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली. 
 
आम्ही स्त्री शक्ती संवाद यात्रा सुरु केलेली आहे, अशावेळी जिल्हाप्रमुख अशा पद्धतीनं शड्डू ठोकत असतील तर अशा गोष्टींना मान्यता नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ यांचा मिळून जो काही निर्णय होईल तो होईल.अशा पद्धतीनं होत असेल तर आम्ही देखील ऐकणार नाही, जिल्हाप्रमुख जर आवाज करत असेल तर यावेळी प्रतिभाताई धानोरकरांना निवडून देताना आणि उमेदवारी जाहीर करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान आहे हे विसरु नका, असं किशोरी पेडणेकर म्हणाला. 


आमचा जिल्हाप्रमुख काम करतोय, आमचादेखील ए, बी, सी सर्व्हे झालेला आहे.  त्या सर्व्हेमध्ये काही गोष्टींचा निश्चित विचार होईल.अशा पद्धतीनं कोण शड्डू ठोकत असेल तर 288 जागा आम्ही लढू, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला. 


इतर बातम्या : 


 Karad North : बाळासाहेब पाटील पाच टर्म कराड उत्तरचे आमदार, सहाव्यांदा रिंगणात उतरणार.. भाजपकडून कोण? उत्तर सापडणार?