Kirit Somaiya in Malegaon : मालेगाव (Malegaon) हे व्होट जिहाद (Vote Jihad), लँड जिहाद केंद्र असल्याचा आरोप भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. त्यामुळे सर्व तपास यंत्रणांच्या रडारवर मालेगाव शहर आले आहे. सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी तहसीलदार, महापालिका आयुक्त आदींची भेट घेतली. या भेटीनंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावा केला आहे. मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना सुरू असून, 1110 बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म दाखले दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, व्होट जिहाद भाग 2 ची सुरुवात गेल्या चार महिन्यांपासून झाली आहे. मालेगाव तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना आहे. 1969 जन्म मृत्यू कायद्यात थोडा बदल करण्यात आला. यात मोठ्या प्रमाणावर फ्रॉड सुरू झाला. मालेगावात ३० डिसेंबरपर्यंत अपर जिल्हाधिकारी यांनी मान्य केलं की 1110 लोकांना जन्म दाखला दिला आहे. तर 400 अर्ज प्रलंबित आहेत. मालेगावात सुमारे 1500 लोकं हे बांगलादेशी रोहींगे आहेत, असे त्यांनी म्हटले.
सर्टिफिकेट दिलेल्यांची चौकशी होणार
भारतीय असल्याचा जन्माचा दाखला दिला जातो. गॅझेटनुसार घरी जन्म झाला तर 50 दिवसाच्या आत नोंदणीचा अर्ज करावा लागतो. 82 वर्षांपासून ते 2 वर्षाच्या लोकांना दाखले देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आणि आयुक्त यांनी जन्म दाखले देऊन टाकले आहेत. एकाच पत्त्याचा अर्ज, एकाच घरातील 4 जणांची नावे. पत्ता केवळ मालेगाव, असे दाखले आहेत. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्यासाठी जन्म दाखला देण्याचा कायदा सुरू आहे. हे दाखले 1 वर्ष आतीलच द्यायचे आहेत. मालेगाव तहसीलदार, महानगरपालिका आयुक्त यांनी आपली चूक मान्य केली आहे. अनावधाने हे सर्टिफिकेट देण्यात आले आहेत. ज्यांना सर्टिफिकेट देण्यात आले त्यांची परत चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
काही राजकारण्यांकडून रोहिंग्यांना मतदार बनवण्याचे काम
मालेगाव महापालिका, तहसीलदार आणि आयुक्त यांचे दाखले देण्यास समर्थन आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे की, याच्या चौकशीचे आदेश द्यावेत. बांगलादेशी आणि रोहिंग्यांची पडताळणी करण्याचे काम ATS ने करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दाखला दिलेल्या 1500 लोकांचा शोध घेतला जाणार आहे. मालेगावातील काही राजकारणी या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना येथे मतदार बनवायचे काम करीत असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केलाय. हे देशविरोधी मोठे षडयंत्र आहे. मालेगाव हे बांगलादेशी रोहिंग्यांचे आश्रयस्थान झाले आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
आणखी वाचा