Kangana Ranaut On Rahul Gandhi : बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवून खासदार झाली आहे. हिमाचल प्रदेशमधल्या (Himachal Pradesh) मंडी येथून कंगनानं निवडणूक लढवली आणि जिंकलीही. अशातच अनेकदा भाजप (BJP) खासदार असलेली कंगना रनौत अनेकदा काँग्रेस नेत्यांवर प्रहार करताना दिसून येते.


कंगना रनौतनं सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. किंबहुना, राहुल गांधींनी हिंडनबर्ग अहवालावर सरकारला कोंडीत पकडलं आहे. ज्यात त्यांनी अदानी समूह आणि सेबी यांच्यातील संगनमताचा आरोपही केला आहे. यावरुन कंगनानं राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. 


कंगना रनौतनं यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये कंगनानं लिहिलंय की, "राहुल गांधी सर्वात धोकादायक माणूस आहे, ते विषारी आणि विध्वंसक आहेत. जर ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत, तर ते या देशाला उद्ध्वस्त करू शकतात, हा त्यांचा अजेंडा आहे. हिंडनबर्गच्या अहवालानं आमच्या शेअर बाजाराला लक्ष्य केलं, ज्याला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आणि पण त्या अहवालात काहीच तथ्य नव्हतं. त्याचा काहीच परिणाम झाला नाही."



आयुष्यभर विरोधी बाकांवर बसण्याची तयारी ठेवा : कंगना रनौत 


खासदार कंगना रनौतनं लिहिलंय की, ते देशाची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. गांधीजी, तुम्ही आयुष्यभर विरोधी बाकांवर बसण्याची तयारी ठेवा आणि आता जशा तुम्हाला वेदना होत आहेत, तसंच या देशातील जनतेचा राष्ट्रवाद, अभिमान आणि गौरव पाहून तुम्हाला वाईट वाटेल. इथली जनता तुम्हाला कधीही नेता बनवणार नाही. 






राहुल गांधी काय म्हणाले? 


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी हिंडेनबर्ग अहवालावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या अध्यक्षांवरील आरोपांमुळे संस्थेच्या अखंडतेशी 'गंभीरपणे तडजोड' झाली आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची पुन्हा स्वत:हून दखल घेणार का? काँग्रेस नेते गांधी यांनीही या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आणि ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) तपासाला इतके का घाबरतात? हे आता पूर्णपणे स्पष्ट झालं आहे.


राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक पोस्ट केली. ते म्हणाले की, देशभरातील प्रामाणिक गुंतवणूकदारांचे सरकारसमोर अनेक प्रश्न आहेत. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? गुंतवणुकदारांचे कष्टाचे पैसे बुडाले तर त्याला जबाबदार कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी, सेबीचे अध्यक्ष की गौतम अदानी? असे अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. 


हिंडनबर्गचा दावा, सेबीवर आरोप, प्रकरण नेमकं काय? 


अदानी घोटाळ्याशी संबंध असलेल्या कंपन्यांत सेबीच्या चेअर पर्सन माधवी पुरी बुच यांची गुंतवणूक असल्याचं समोर आलं आहे. हा आरोप हिंडनबर्ग रिसर्चनं केलाय. मात्र माधवी पुरी बुच यांनी हे आरोप फेटाळले आहेत. अमेरिकेतील  हिंडनबर्ग रिसर्च LLC नं कागदपत्रांचा हवाला देत 10 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित केलेल्या नव्या अहवालात सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचा 'अदानी मनी फ्रॉनिंग स्कॅंडल' म्हणून वापरल्या गेलेल्या दोन ऑफशोर फंडांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप केला आहे. 


हिंडनबर्गच्या अहवालानुसार, माधवी बुच आणि त्यांच्या पतीनं बर्म्युडा आणि मॉरिशसमधील ऑफशोर फंडांमध्ये अघोषित गुंतवणूक केली होती, याच संस्थांचा वापर गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांनी भारतीय बाजारातील अदानी शेअरच्या किंमती वाढवण्यासाठी केल्याचा हिंडनबर्गचा आरोप आहे. तसंच माधवी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आणि त्यांच्या सर्व गुंतवणुकीचा तपशील सेबीकडे पहिल्यापासूनच आहे. त्यांचं जीवन आणि आर्थिक व्यवहार खुलं पुस्तक असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर हिंडनबर्ग चारित्रहनन करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.