Aditya Thackeray : केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत. याच दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यात भेट होणार आहे. याभेटीबाबत बोलताना शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांची सूचक विधान केलं आहे. या बैठकीत देशपातळीवर चर्चा तर होणारच आहे. त्याचबरोबर राजकीय घडामोडींवर देखील चर्चा होणार, असं ते म्हणाले आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि लायन्स क्लब यांच्यावतीने आयाेजिलेल्या 'ग्लाेबल वाॅर्मिंग- ग्लाेबल वाॅर्निंग' कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.


भाजपकडून सुडाचे राजकारण सुरू 


शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फेरीवर बोलताना ते म्हणाले आहेत की, भाजप कडून सुडाचे आणि थर सोडून राजकारण सुरू आहे. त्यावर मला काहीच बोलायचं नाही आहे, असं ते म्हणाले आहेत.


वायफायचे स्पाॅट सारखे आक्सिजन स्पाॅट शोधावा लागेल


ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आज जसे आपण वायफायचे स्पाॅट शोधतो, तसेच आपल्याला आक्सिजन स्पाॅट शोधावा लागेल. या शहारातून त्या शहरात जाण्यासाठी आपण हायवे बनवत आहोत. मात्र हे हायवे आपण रुग्णालयात जाण्यासाठी तयार करत आहोत का? शहरीकरण करत असताना विकास आराखडा देखील तयार केला पाहिजेत, असं ते म्हणाले आहेत.


दरम्यान, केसीआर हे लवकरच मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारणार आहेत. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहे.


महत्त्वाच्या बातम्या: