ठाणे: राज ठाकरे हे शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप करतात. पण त्यांच्या मनात जातीद्वेष आणि धर्मद्वेष किती आहे, हे त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जातीपातीच्या राजकारणाबाबत बोलू नये. 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी असते तेव्हा राज ठाकरे त्यांचा दादरमधील बंगला सोडून लोणावळ्याला जाऊन का राहतात?  हे कोणाला माहिती नाही, हे जगाला सांगावे लागेल, अशी खरमरीत टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली. ते सोमवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


राज ठाकरे यांनी सोमवारी सोलापूरमधील पत्रकार परिषदेत शरद पवार यांना लक्ष्य केले होते. महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला होता. या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणाबाबत बोलू नये. त्यांनी परप्रांतीय मुसलमान आणि दलितांच्या विरोधात भूमिका घेतली. अशा माणसाने जातीपातीबद्दल बोलावे आणि ते पण शरद पवार यांच्याबद्दल, हे हास्यास्पद आहे आणि त्यांना हास्यविनोद करण्याची सवय आहे, असे आव्हाड यांनी म्हटले.


एसी घरात जन्मलेल्यांना आरक्षणाचं महत्त्व काय कळणार? आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला


राज ठाकरे म्हणतात, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. आरक्षण कशासाठी आहे, हे समजून घ्यावे लागते. एअर कंडिशन घरात जन्म झालेल्यांना आरक्षणाचे महत्त्व काय कळणार? आरक्षणाचे महत्त्व समजण्यासाठी त्या परिस्थितीतून जावे लागते. याचा अनुभव असावा लागतो. ज्यांच्या हाताची पाचही बोटं तुपात आहेत आणि डोके कढईत त्यांना काय आरक्षण कळणार? जातीनुसार जणगणना होऊ जाऊ दे, बहुजन समाज किती आहे हे महाराष्ट्राला कळेल. त्यांची आर्थिक परिस्थिती काय आज ते कळेल. आर्थिक दुर्बल असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 


राज ठाकरे यांना नेहमीच चर्चेत राहायला आवडते. चर्चेत राहाचे असेल तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांचं अस्तित्व संपलं आहे. शरद पवार यांनी काय करावं त्यापेक्षा राज ठाकरे यांनी काय करावं, कितीवेळा त्यांनी भूमिका बदलली, याचा त्यांनीच विचार करावा. राज ठाकरे यांनी शरद पवार यांना उपदेश करायला जाऊ नये, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.


शरद पवार यांनी कुठल्या कुठल्या समाजासाठी काम केले,हे मी या क्षणी सांगण्याची गरज नाही. त्या त्या समाजाला याबद्दल व्यवस्थित माहिती आहे. शरद पवारांनी आपल्यासाठी काय केले? मग ते धनगर असो आदिवासी असो की शेड्युल कास्ट असो .. भारतात मंडल आयोग आणण्याची हिंमत नव्हती. ओबीसी आरक्षण देण्याचं काम शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले. त्यामुळे साहेब जातीपातीचं राजकारण करत आहेत, असे सांगू नये, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.


आणखी वाचा


 शरद पवारांनी महाराष्ट्राचं मणिपूर करायला हातभार लावू नये, त्यांचं आजपर्यंत राजकारण पाहता... राज ठाकरेंना टोला