Jitendra Awhad On Ajit Pawar: बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्याप्रकरणी राजकारण तापलं आहे. यादरम्यान धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शनिवारी (18 जानेवारी) राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यावेळी बीडचं पालकमंत्रिपद मंत्री धनंजय मुंडेंना न देता अजित पवारांना देण्यात आलं. 


बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवारांची नियुक्ती झाल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक्सवर (आधीचे ट्विटर) एक पोस्ट केली आहे. यावर अजित पवारांचा एक व्हिडीओ देखील जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला आहे. अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्रिपदी मुख्यमंत्र्यांनी निवड केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...हे लिहिण्याचे कारण एवढेच की, "पुण्याचे पालकमंत्री असताना एक मककोचा आरोपी काही जणांच्या आग्रहाखातर आपण प्रयत्नपूर्वक सोडवला होता," असे वक्तव्य आपणच एका जाहीर सभेत मनमोकळेपणे केले होते.  असा प्रयत्न बीडमध्ये जाऊन करू नका, अशीच आपणाला विनम्र विनंती आणि हात जोडून प्रार्थना...कायद्याचे राज्य स्थापित कराल, ही जी शपथ घेतली आहे, त्या शपथेची फक्त आठवण करून देतोय, असं जितेंद्र आव्हाड पोस्टद्वारे म्हणाले.


पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडे काय म्हणाले?


बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे. बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो, असं धनंजय मुंडे म्हणाले. सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार...मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, असंही धनंजय मुंडेंनी यावेळी सांगितले.


संबंधित बातमी:


Dada Bhuse: गिरीश महाजन यांचं नाशिकचं पालकमंत्रिपद जाताच शिवसेनेच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, दादा भुसे यांना....