Jitendra Awhad : 2021 साली उदगीर येथील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकाने दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यास एका कोरोनाबाधित मुस्लिम महिला रुग्णास मारून टाकण्याची चिथावणी दिली. त्याचा ऑडिओ संवाद आता व्हायरल झाला आहे. वैद्यकीय पेशाला काळिमा फासणारी ही घटना समोर आल्यानंतर सदर महिलेच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात (Udgir City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संताप व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटले आहे की, उदगीर येथील नांदेडनाका परिसरातील कोविड सेंटरमधील डॉक्टरांची कोरोना काळातील एक ऑडिओ क्लिप तब्बल पाच वर्षांनंतर उघडकीस आलीय. एक मुस्लिम धर्मीय महिला कोरोनाने अत्यवस्थ असताना त्या रुग्णालयातील बेडच्या संदर्भात बोलताना डॉ. शशिकांत देशपांडे आपल्या सहाय्यक असलेल्या डॉ. शशिकांत डांगे याला म्हणतोय की, कशाला त्या ***चे लाड करतोस... मारून टाक तिला... दुसऱ्या पेशंटला जागा करून दे... तुला ***चा लय पुळका.. यानंतर या दायमी आडनाव असलेल्या मुस्लिम महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू होतो.
तर डॉक्टर कशाला बनलास रे बाबा
ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर त्या दिवंगत मुस्लिम महिलेचे पती अजमुद्दीन गौसुद्दीन दायमी यांनी निर्लज्ज डॉक्टर शशिकांत देशपांडे याच्या विरोधात उदगीर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे अद्याप अटक नाही. ह्या डॉक्टरला पहिलं उचला. असे याने किती जणांचा मर्डर केला आहे हे समोर येऊ द्या. एवढा द्वेष ह्यांच्या मनात असेल तर डॉक्टर कशाला बनलास रे बाबा, करायचा ना आपल्या पूर्वजांचा धंदा, असा म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केलाय.
नेमकं प्रकरण काय?
एप्रिल 2021 मध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. शासकीय सामान्य रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नव्हते. अन्य तीन ठिकाणी कोविड सेंटर उभारले होते. त्या काळात येथील शासकीय सामान्य रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कर्तव्यावर असलेले डॉ. शशिकांत देशपांडे आणि डॉ. शशिकांत डांगे यांच्या मोबाइलवर झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. या संवादात डॉ. देशपांडे हे कोविड सेंटरवर कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. डांगे यांच्याशी संवाद साधताना नांदेड नाका येथील कोविड सेंटरमध्ये बेड आहेत का, अशी विचारणा करतात. डॉ. डांगे बेड उपलब्ध नसल्याचे सांगतात. तेव्हा डॉ. देशपांडे यांनी 'दायमीच्या पेशंटला मारून टाक की, कशाला ठेवलेय उगीच, ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला... लई पडलंय' असे म्हणून जातीवाचक शब्द वापरले. दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महिलेचे पती दायमी अजिमोद्दीन गौसोद्दीन (रा. आझादनगर, उदगीर) यांनी डॉ. शशिकांत देशपांडे यांच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून डॉ. शशिकांत देशपांडे यांच्यावर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
आणखी वाचा