पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane Death Case) प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याप्रकरणी नागरिक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या सासरच्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सासरा, दीर, सासू, नणंद आणि वैष्णवीचा नवरा यांना पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर (Vaishnavi Hagawane Death Case) तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून त्याबाबतची नोटीस काढण्यात आली होती. राजेंद्र हगवणेकडं पुण्यातलं मुळशी तालुक्यातचं अध्यक्षपद होतं. तर लेक सुशील हगवणे युवक काँग्रेसचा पदाधिकारी होता. या घटनेनंतर नागरिक संताप व्यक्त करत आहेत, दरम्यान, सुशील हगवणेची एक सोशल मिडिया पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे, त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लेक आणि सुनेबाबत लिहलं आहे. सुशीलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत आपला राग व्यक्त केला आहे. (Vaishnavi Hagawane Death Case)
पोस्ट नेमकी कशाबद्दल?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना सुशील हगवणे याने मागच्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांचा प्रचार केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवली होती. बारामतीत नणंद विरूध्द भावजय अशी लढत झाली होती. त्यावेळी सुशील हगवणे हा सुनेत्रा पवारांचा प्रचार करत होता. त्यावेळी त्यानं सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी इन्स्टाग्रामवरती पोस्ट केली होती. 'यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणुया....सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात, सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया.... एक मत सुनेसाठी,' अशी पोस्ट सुशील हगवणे याने केली होती.
सुशीलच्या पोस्टवरती नेटकऱ्यांचा संताप
सुनेसाठी मतदान करण्याबाबत आवाहन करणाऱ्या सुशील हगवणेच्या घरातील व्यक्तींनी दोन्ही सुनांना छळलं. दोघीनांही प्रचंड त्रास दिला. त्याच त्रासातून एकीनं घर सोडलं तर दुसरीनं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं. त्यामुळे वर्षभरापुर्वीची सुशील हगवणेची पोस्ट सध्या चर्चेत आली असून नेटकऱ्यांनी कमेंट करत रोष व्यक्त केला आहे. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण' अशी हगवणे कुटुंबाची अवस्था असल्याच्या कमेंट सुशीलच्या पोस्टखाली दिसून येत आहेत.
पोस्टखाली करण्यात आलेल्या बहुतांश कमेंट आठवडाभरापूर्वीच्या
विशेष म्हणजे सुशील हगवणेची ही पोस्ट 3 मे 2024 आहे. मात्र, त्याखाली आलेल्या बहुतांश कमेंट या गेल्या काही तासांपूर्वीच्या किंवा आठवड्याभरात करण्यात आलेल्या आहेत. सुशील हगवणेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुनेत्रा पवार आणि रुपाली ठोंबरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. त्यावरुन अनेकांनी नेत्यांवरतीही हल्लाबोल केला आहे. तुमचे कार्यकर्ते काय प्रकार करतात ते बघा, काल चॅनेलवर चर्चेत तुम्ही म्हणाला होतात की मला माहीत नव्हतं ते आमच्या पक्षात आहेत ते. मग हे काय आहे?, असे प्रश्न ठोंबरेंना विचारण्यात आले आहेत. दरम्यान या परिवाराचे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसोबत फोटो असल्याचे समोर आलं आहे.
सुशीलच्या पोस्टखालील कमेंट काय?
निर्लज्ज राजकारणी, सहआरोपी करा ह्यांना पण...सुनेबद्दल कोण बोलतंय बघा, राजकारणात माणसं किती खोटं बोलतात बघा, स्वत:च्या घरातील सुनांना नीट सांभाळायचं आणि इज्जत द्यायचं कळत नाही तुम्हाला आणि इथे लोकांना ज्ञान शिकवतो का, तू वागलास काय आणि इथे बोलतोस काय, तुम्हाला खूप कळत सुनेचा मान कसा ठेवायचा.....अख्खा महाराष्ट्र बघतोय काय लायकी तुमची, अशा स्वरुपाच्या कमेंट्स सुशील हगवणेच्या पोस्टखाली नेटकऱ्यांनी केल्या आहेत.