ठाणे : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुढाकार घेत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदिर उभारुन त्याचा जीर्णोद्धार केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते यावेळी पूजा करण्यात आली. शरद पवारांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्यावरुन मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash mahajan) यांनी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर खोचक टाकी केली. आता, या टीकेला आमदार आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शेवटी पवारांना हिंदू धर्माला शरण जावे लागले. शरद पवार स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात, ही हिंदूंची ताकद आहे, असे प्रकाश महाजन यानी म्हटले होते. त्यावर, ह्यात ताकदीचा काय प्रश्न आहे, असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी मनसेच्या प्रकाश महाजन यांना प्रत्युत्तर दिलंय. तसेच, 2004 पासून म्हणजेच गेल्या 20 वर्षांपासून या मंदिर उभारणीसाठी मी प्रयत्नशील होतो, असेही आव्हाड यांनी सांगितले.
शरद पवार स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात. हिंदू धर्माच्या दूर जाऊन राजकारण होऊ शकत नाही, हे शरद पवारांच्या लक्षात आलं. धर्माजवळ जाण्याचा हा प्रकार आहे. जितेंद्र आव्हाडांना तुळजाभवानीचे मंदिर बांधावे लागले, ही हिंदूंची ताकद आहे, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली होती. त्यावरुन, आव्हाड यांनी पलटवार केला. आपणा सर्वांच्या माहितीकरिता सांगू इच्छितो की, 2004 साली हे मंदिर उभं राहिलं. परंतु, हे रहदारीच्या रस्त्यात असल्याकारणाने तत्कालीन महापालिका आयुक्त व माननीय न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार राहिलं. सदर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा मानस गेली अनेक वर्ष माझ्या मनात होता. कदाचित हे राज्यातील पहिले असे मंदिर असेल ज्यात बांधकामाची तसेच मंदिर वापराची परवानगी घेतली आहे. त्यामागे माझी नितांत श्रद्धा आहे आई तुळजाभवानी मातेवर. समस्त बहुजनांचे, उभ्या महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या तुळजाभवानी आईचे हे प्रतितुळजापूर देऊळ असंख्य भक्तांचे शक्ती स्थान ठरेल. इतिहास साक्षी आहे छत्रपती शिवरायांचे देखील तुळजाभवानी मंदिर प्रेरणास्थान होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आम्हाला मुंज करण्याची आवश्यकता नाही
आई तुळजाभवानीनेच उभ्या महाराष्ट्राला मोगलाई विरोधात उभे ठाकण्याची ताकद दिली. आमच्यासारख्या बहुजनांना तुमच्यासारख्यांनी पिढ्यानपिढ्या वंचित ठेवलं. शिक्षण,पाणी,न्याय आणि हक्कांसाठी आम्हासारख्यांना मुंज करण्याची आवश्यकता नाही, ते तुम्हालाच लखलाभ असू द्या, असा पलटवारही आव्हाडांनी प्रकाश महाजनांवर केलाय. आणि हो आपणही संपूर्ण कुटुंबासहित उभ्या महाराष्ट्राचे कुलदेवी असणाऱ्या तुळजाभवानी आईच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, आपले मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे स्वागतच असेल, असे निमंत्रणही आव्हाड यांनी प्रकाश महाजनांना दिले.
हेही वाचा
ना जात पाहिली, ना धर्म; 25 वर्षात अडीच हजार मुलींचा संसार थाटला;आई-बापाच्या मायेनं केलं कन्यादान