मुंबई: माढ्यामधून (Madha Lok Sabha Election) शरद पवार गटाचा उमेदवार जवळपास निश्चित झाल्यानंतर आता ही निवडणूक अधिक रंगतदार होणार याच शंका नाही. त्याचमुळे आता प्रत्येक घटक आपल्यासोबत असावा असा दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू आहे. पण राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची भाजप नेत्यांबद्दल आणि भाजपच्या नेत्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दलच्या तक्रारी वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे माणचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी मोठं वक्तव्य केलंय. तुम्ही सोबत आला तर ठिक, नाहीतर तुमच्याविना आम्ही निवडणूक लढू असं ते म्हणाले.
भाजपचे खासदार आणि उमेदवार रणजित निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याचवेळी दुसरीकडे, राष्ट्रवादीतील नाराजांनी अजित पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी संबंधितांना काही झालं तरी महायुतीचं काम करावंच लागेल असे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी हे रणजित निंबाळकरांच्या उमेवारीवर नाराज असल्याचं सांगण्यात येतंय. त्यांनी आज अजित पवारांची भेट घेऊन रणजित निंबाळकरांची तक्रार केल्याची माहिती आहे. त्यानंतर अजित पवारांनी त्यांना महायुतीचं काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
काय म्हणाले जयकुमार गोरे?
ही निवडणूक सोबत आलेल्याना घेऊन सन्मानाने लढायची आहे. मात्र काहींना अडचण असेल तर निवडणूक त्यांच्याशिवायही लढायची आमची तयारी आहे. काही लोकांना मार्गच काढायचा नसेल, तर ते अशी चर्चा करतात, त्यांची तशी वाटचाल सुरू असते.
मुळात आम्हालाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा सहकार्य हवा आहे. कारण माढामध्ये आमचा उमेदवार आहे, आम्हीच त्यांना सहकार्य मागत आहोत. राष्ट्रवादीचे बहुतांशी नेते आणि कार्यकर्ते मदत करत आहेत. मात्र काही लोकांना काम करायचेच नाही, किंवा त्यांच्याबद्दल आधीच तक्रारी होत्या, त्यांनीच अजितदादांकडे तक्रार केली असावी.
काही गोष्टी फलटणमध्ये अडचणीच्या आहेत, तर काही गोष्टी माणमध्ये अडचणीच्या आहेत. त्याबद्दल अजितदादा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलत आहेत आणि देवेंद्र फडणवीस आमच्याशी बोलत आहेत असं सांगत जयकुमार गोरे म्हणाले की, आम्ही हकार्य करत आहोच म्हणूनच राष्ट्रवादीचे बबनदादा आणि संजयमामा शिंदे हे काम करत आहेत. काही ठिकाणी अडचण आहे, कारण आजवर आम्ही एकमेकांच्या विरोधात राजकारण करत आलो. तेच विषय आता समोर येत आहेत. कारण प्रत्येकाला आपल्या राजकीय अस्तित्वाची काळजी आहे, त्यातून मार्ग निघेल. मात्र काही लोकांना मार्गच काढायचा नसेल, तर ते अशी चर्चा करतात.
पुन्हा पुन्हा तक्रार करणे सुरू आहे, मात्र मार्ग चर्चेतून निघत असतो. आम्ही चर्चेतून मार्ग काढू, काही लोक सोडली तर अजित पवार यांच्यासोबतचे सर्व लोक आम्हाला मदत करत आहेत असं जयकुमार गोरे म्हणाले.
काय म्हणाले रणजित निंबाळकर?
राजकारणातील समस्या ही लाईटचे बटन दाबले आणि लगेच सुटते अशी नसते. त्यासाठी चर्चेतून तोडगे काढावे लागतात. माढा संदर्भात वरिष्ठ नेत्यांसोबत आणखी एकत्रित बैठक होण्याची शक्यता आहे असं रणजित निंबाळकरांनी स्पष्ट केलं. महायुतीचे दोन्ही नेते, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे महाराष्ट्राची नस ओळखणारे नेते आहेत, त्यांचा तळागाळापर्यंत संपर्क आहे. दोन्ही पक्षातील समन्वय योग्य पद्धतीने चालला आहे, तो आणखी मजबूत होईल असं रणजित निंबाळकर म्हणाले.
धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्यासोबत जाणार या संदर्भात मला फारशी कल्पना नाही. कोण कुठे जाणार आहे याची मला माहिती नाही. पण आपल्याला जो विरोध होता तो मावळलेला दिसेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
ही बातमी वाचा: