Hema Malini :  बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी सध्या लोकसभा निवडणूक प्रचारात व्यस्त आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघातून त्या आता दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हेमा मालिनी या शेतात पिक कापणी करताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत हेमा मालिनी यांच्यावर टीका केली आहे. 


हेमा मालिनी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या शेतात पीक कापताना दिसत आहे. हेमा मालिनी या कांजीवरम साडी नेसून गव्हाची कापणी  करताना दिसत आहे. गावातील काही महिलाही त्याच्यासोबत आहेत. काही युजर्सने हेमा मालिनी यांचे कौतुक केले. तर, काहींनी टीका केली आहे. निवडणुकीसाठी हेमा मालिनी असे फोटोशूट करत असल्याची टीका लोकांनी केली आहे. 


हेमा मालिनी यांनी स्वतःचे चार वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. काहींमध्ये त्या पिक कापताना दिसत आहे.   काहींमध्ये त्या कापणी केलेले पिक आणि सोबत विळा घेऊन शेतात असल्याचा फोटो आहे. फोटो शेअर करताना हेमा मालिनी यांनी “आज मी शेतात जाऊन त्या शेतकऱ्यांशी बोलले ज्यांना मी गेल्या 10 वर्षांपासून नियमित भेटत आहे. त्यांच्या सोबत मला पाहून त्यांना आनंद झाला. त्यांच्या आग्रहास्तव काही फोटो काढले असल्याचे हेमा मालिनी यांनी म्हटले. 






नेटकऱ्यांकडून टीका... 


या फोटोवर हेमा मालिनींवर जोरदार टीका करण्यात येत आहे. एका युजरने म्हटले की, “ एप्रिलच्या महिन्यात कांजीवराम सिल्क आणि मोकळे केस! तुम्हाला वाटत नाही का पीआर एजन्सी रद्द करावी. एका दुसऱ्या युजरने “काय टाईमपास. आपण हेलिकॉप्टरशिवाय किती वेळा गेला आहात? थोडी तरी लाज बाळगा. हिम्मत असेल तर भाजपशिवाय लढून दाखवा,  असे एका युजरने म्हटले.प्रियम नावाच्या युजरने लिहिले, “तुम्हाला वाटते की खासदार असणे म्हणजे शेतात फोटो क्लिक करणे. शेतकऱ्यांची चेष्टा करू नका. "सर्वप्रथम, लोकांनी तुम्हाला मत का द्यावे?"


पाच वर्षांपूर्वीही शेतात केली होती कापणी


हेमा मालिनी यांनी पाच वर्षांपूर्वीदेखील 2019 च्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान शेतात कापणी केली  होती. त्यावेळी त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. शेतात जाऊन फोटो काढून मते मागण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. 


त्याशिवाय, हेमा मालिनी यांनी ट्रॅक्टरही चालवला होता.त्यावेळी देखील लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती.