Jaykumar Gore, सातारा : साताऱ्यातील (Satara) मायणी येथील मेडिकल कॉलेजमधील  कोविड घोटाळा प्रकरणात माण विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख आणि संस्थेशी निगडित पदाधिकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोविड काळात मायणी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर मृत लोक जिवंत दाखवून 35 लोकांचे पैसे हडपल्याचा संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख (Deepak Deshmukh) यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.  


या प्रकरणात हायकोर्टाने सातारा पोलिसांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टात या प्रकरणातील चौकशीची मागणी करणारे याचिकाकर्ते दीपक देशमुख हे संस्थेचे उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावरही केला गुन्हा दाखल करण्यात आलाय. सातारा जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्यचे अधिकारी देविदास बागल यांनी या संस्थेतील सर्व जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर वडूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून  गुन्हा दाखल केलाय.


जयकुमार गोरे यांच्या विरोधातील भ्रष्टाचारांच्या आरोपांना गंभीरतेनं घ्या, उच्च न्यायालयाने दिले होते आदेश 


भाजपा आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या विरोधातील भ्रष्टाचारांच्या आरोपांना गंभीरतेनं घ्या अशा सक्त सूचना मुंबई उच्च न्यायालयाने सातारा पोलिस अधीक्षकांना दिल्या होत्या. आमदार जयकुमार गोरे यांनी कोविड काळात 200 पेक्षा अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधीवाटपात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी मायणी येथील दीपक देशमुख यांनी जयकुमार गोरेंविरोधात हायकोर्टात याचिका केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाकडून या याचिकेची गंभीर दखल घेण्यात आली होती. 


आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप


जयकुमार गोरे, त्यांच्या पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची या याचिकेतून मागणी करण्यात आली होती. सरकारनं मोफत कोरोना उपचारासाठी सर्व रुग्णालयं आणि कोविड सेंटरना मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा विनामुल्य देण्याकरता पुरवला होता. मात्र आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.  अखेर आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल झाल्याने जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


सोलापुरातून राष्ट्रवादीची 'फुल पँटच' शरद पवारांना द्यायची, धैर्यशील मोहितेंनी विधानसभेचं प्लॅनिंग गोष्टीतून सांगितलं