पुणे: भाजपचे पुण्यातील लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी सोमवारी सभा घेणार आहेत. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान मोदींची (PM Modi) सभा होणार आहे. या सभेसाठी भाजप आणि मित्रपक्षांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींची पुण्यातील सभा गर्दीचे विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. ही बाब ध्यानात घेऊन पुण्यातील रस्ते वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळपासूनच नियोजित रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. त्यामुळे पुणेकरांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागेल. या सगळ्यामुळे पुणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा भाजपच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात राज्यात सभा घेणरा आहेत. 29 आणि 30 एप्रिल रोजी महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सहा सभांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतीच मोदींनी कोल्हापूरमध्ये सभा घेतली होती. त्यानंतर आज पुण्यात त्यांची सभा होईल. तर मंगळवारी पंतप्रधान मोदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माढा लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. मोदींची सभा म्हणजे विजयाची खात्री अशी महायुतीमधील उमेदवारांची धारणा आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांकडून मोदींच्या सभांसाठी आग्रह धरला जात आहे.


पुण्यातील खालील रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद


* टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक, रस्ता बंद


* सोलापुर रोडवरील अर्जुन रोड जं. ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार रस्ता बंद


* बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद


पुणेकरांना पर्यायी मार्ग उपलब्ध


* गोळीबार मैदान चौक लुल्लानगर ते इच्छित स्थळी


* भैरोबानाला ते लुल्लानगर ते इछित स्थळी


* वॉर मेमोरीयल ते घोरपडी ते डोबारवाडी मार्गे बी.टी. कवडे रोडने इच्छित स्थळी


* मोरओढा सदन कमांड कौन्सिल हॉल ब्लू नाईल मार्गे इच्छित स्थळी


पुण्यात अवकाश उड्डाणावर निर्बंध


पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी स्थानिक प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच तयारीला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अवकाश उड्डाणावर निर्बंध घालणारे आदेश जारी केले होते. त्यामुळे पुण्यात 27 एप्रिल रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 30 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणास मज्जाव असेल.


आणखी वाचा


माढा जिंकण्यासाठी आता PM मोदी मैदानात, मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यात 28 एकरावर जंगी सभा, वारं फिरणार?