Jalna Lok Sabha Election Result  : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जालना (Jalna Lok Sabha Election 2024 Result) हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला. या जागेवर भाजपचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांच्यात थेट लढत होत आहे. गेल्या 20 वर्षांपासून दानवे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यावेळी कल्याणराव यांच्या रुपात त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले होते. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या भूमिकेमुळे जालन्यातील राजकारण चांगलेच बदलले. त्यामुळे यावेळी नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र येथे कल्याणराव काळे यांनी विजयी कामगिरी केली आहे. काळे यांनी दानवे यांचा1 लाख 9 हजार 958 मतांच्या फरकाने विजय झाला आहे. 

                      उमेदवार                             पक्ष                               निकाल
                    रावसाहेब दानवे                          भाजप                               पराभूत (497939 मते)
                    कल्याणराव काळे                          काँग्रेस                               विजयी (607897 मते) 

  

शेवटी निवडणुकीचे चित्र बदलले

सुरुवातीला या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचे पारडे जड मानले जात होते. जालना जिल्ह्यातील निवडणूक एकतर्फी होते की काय, अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या. पण ही जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली. कल्याणराव काळे यांच्यासाठी या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांच्या सभा झाल्या. त्यामुळे प्रचाराच्या दिवसांत काहीचे चित्र बदलल्याचे दिसले. शेवटी कल्याणराव काळे आणि रावसाहेब दानवे यांच्यात चुरशीची लढत होणार, असे मत व्यक्त केले जात होते. 

35 वर्षांचा राजकीय अनुभव पणाला, काय फायदा होणार? 

2009 साल वगळता रावसाहेब दानवे यांनी 1999 सालापासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. दानवे हे भाजपचे एक अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. आपली ग्रामीण भाषाशैली आणि खुल्या व्यक्तीमत्त्वामुळे ते सामन्यातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत. गेल्या 35 वर्षांपासून ते राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावला आहे. शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी येथे भाजपने मोठी यंत्रणा कामाला लावली होती. त्याचे परिणाम नेमके काय आणि कसे होणार? असे विचारले जात होते. 

मराठा मतदारांची भूमिका महत्त्वाची

या मतदारसंघात मराठा समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मराठा आंदोलनासाठी झगडणारे मनोज जरांगे हे याच जिल्ह्यातील आहेत. सध्या ते मराठा सामजाचे नवे नेते म्हणून नावारुपाला आले आहेत. जरांगे यांनी अनेक सभा, उपोषणं याच जिल्ह्यात केली आहेत. त्यामुळे काही महिन्यांपासून जालना जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. जरांगे यांचा जालना जिल्ह्यातील मराठा समाजावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी या निवडणुकीत कोणतीही थेट भूमिका घेतलेली नाही. पण मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला पाडा, असं आवाहन त्यांनी केलंय त्यामुळे आता मराठा समाज नेमकं कोणाच्या पाठीमागे उभं राहतोय. यावरच येथे विजयी उमेदवार ठरणार आहे. म्हणजेच या निवडणुकीत मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार असे म्हटले जात होते.  

जालना लोकसभेची रचना

जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन तर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री ,पैठण या एकूण सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. 

मतदारसंघाचा इतिहास

एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा बाळासाहेब पवार, अंकुशराव टोपे यासारख्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसच्या वतीने या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 1991 साली अंकुशराव टोपे यांनी काँग्रेसकडून ही जागा लढवत विजय मिळवला होता, हा काँग्रेसचा आजपर्यत चा शेवटचा विजय. 1996 पासून ही जागा भाजपसाठी नेहमीच अनुकूल राहिली गेली. 7 टर्म या मतदारसंघावरती भाजपचाच वर्चस्व आहे,यातील 5 टर्म सातत्याने रावसाहेब दानवे यांचाच विजय झालाय.

रावसाहेब दानवे पाच वेळा खासदार

1996 आणि 1998 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तमसिंग पवार हे भाजपतर्फे निवडून आले होते. 1999 मध्ये काँग्रेसचे उमेदवार ज्ञानदेव बांगर यांचा पराभव करीत रावसाहेब दानवे हे प्रथमच खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर सलग पाच वेळा रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 1999मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून येण्यापूर्वी दोन वेळेस ते भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

2009 मध्ये काँग्रेस उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध चांगली लढत दिली होती या लढतीत डॉक्टर कल्याण काळे यांचा 8 हजार 482 मतांनी पराभव झाला होता. 2014 साली मोदी लाटेत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास आवताडे यांचा 2 लाख 6 हजार 798 मतांनी पराभव केला होता.

2024 सालचे जालना लोकसभा विधानसभानिहाय मतदान

जालना (विधानसभा)
1) कल्याण काळे काँग्रेस -93756
2) रावसाहेब दानवे भाजप - 83166
लीड कल्याण काळे- 10590

बदनापूर (विधानसभा)
1) कल्याण काळे काँग्रेस -102959
2) रावसाहेब दानवे भाजप - 81487
लीड कल्याण काळे-21472

भोकरदन (विधानसभा)
1) कल्याण काळे काँग्रेस -100013
2) रावसाहेब दानवे भाजप - 99051
लीड कल्याण काळे-962

सिल्लोड (विधानसभा)
1) कल्याण काळे काँग्रेस -101037
2) रावसाहेब दानवे भाजप - 73278
लीड कल्याण काळे-27759

फुलंब्री(विधानसभा)
1) कल्याण काळे काँग्रेस -112720
2) रावसाहेब दानवे भाजप - 82864
लीड कल्याण काळे-29856

पैठण(विधानसभा)
1) कल्याण काळे काँग्रेस -95019 
2) रावसाहेब दानवे भाजप - 67163
लीड कल्याण काळे-27856

पोस्टल मते
1) कल्याण काळे काँग्रेस -2393
2) रावसाहेब दानवे भाजप - 2130
लीड कल्याण काळे-263

एकूण मते
1) कल्याण काळे काँग्रेस -607897
2) रावसाहेब दानवे भाजप - 497939

सध्या 'या' मतदारसंघात कोणाची किती ताकद?

जालना : कैलास गोरंट्याल, काँग्रेस
भोकरदन : संतोष दानवे, भाजपा
बदनापूर : नारायण कुचे, भाजपा
सिल्लोड : अब्दुल सत्तार, शिवसेना शिंदे गट
पैठण : संदीपान भुंबरे, शिवसेना शिंदे गट
फुलंब्री : हरिभाऊ बागडे, भाजप
2019 निवडणुकीचा निकाल

मागील निवडणुकीत रावसाहेब दानवे 3 लाख 32 हजार 815 मतांनी विजयी झाले होते.

1) रावसाहेब दानवे,भाजपा - 698019

2) विलास अवताडे, काँगेस - 365204

3) डॉ.शरदचंद्र वानखेडे, वंचित - 77158

या मतदारसंघात जातीय समीकरणे काय आहेत?

एकूण मतदान - 1938621
स्त्री मतदार - 916319
पुरुष मतदार - 1018251
तृतीयपंथी मतदार - 51
जातीय समीकरणं 
मराठा - 367460 - 19%
मुस्लीम - 348120 - 18%
ओबीसी - 580200 - 30%
बौद्ध - 328780 - 17%
इतर - 309440 - 16%

हेही वाचा :

Lok Sabha Election Result 2024 : चिखलीकर की वसंतराव चव्हाण? नांदेडमध्ये कोण ठरणार सरस?

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Result 2024 : संभाजीनगरात खैरे, भुमरे की जलील मारणार बाजी?