Jalgaon News : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Maryadit) निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. मात्र ही निवडणूक सर्वपक्षीय होऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला होता. परंतु मुक्ताईनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी बिनविरोध निवडणूक करण्यास प्रखर विरोध दर्शवला आहे. मी एकनाथ खडसे यांच्या सावलीत उभा राहणार नाही, असं मंगेश चव्हाण म्हणाले.
ज्यांच्यावर आपण आरोप केले त्यांच्यासोबत गेल्यास लोक तोंडात शेण घालतील. आपल्या सोयीसाठी राजकारण केल्यास जनतेचा राजकीय लोकांवरचा आणि सरकारवरचा विश्वास उडेल, अशा प्रकार शब्दात आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंचा विरोध केला. मी निवडणूक लढवणार असून एकनाथ खडसे यांची बिनविरोध निवड होणार नसल्याचं मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत राजकारण तापलं
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरुन जळगाव जिल्ह्याचे राजकारण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे. राजकारणातील मातब्बर नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)यांची प्रतिष्ठा या निवडणुकीसाठी पणाला लागली आहे.
गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण निवडणूक लढवण्यावर ठाम
जिल्हा दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून यात उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. आज या निवडणुकीत उमेदवारांच्या माघारीचा दिवस आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही निवडणूक सर्वपक्षीय होऊन बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यावर एकनाथ खडसे यांनीही चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र भाजपचे नेते गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी आम्हीही निवडणूक लढवणारच असून तुम्ही जिंकून दाखवा, असं थेट आव्हान एकनाथ खडसे यांना दिलं आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघाची निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी नेत्यांच्या सुरु असलेल्या हालचालींना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आव्हान दिल्यामुळे आता ही निवडणूक चुरशीची होणार हे मात्र आता निश्चित झालं आहे.
VIDEO : Mangesh Chavan on Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या सावलीतही उभं राहणार नाही - मंगेश चव्हाण ABP Majha