मुंबई : राज्यातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या सभांचा धडाका आता सुरू झाला असून उत्तर-मध्य मुंबई लोकसभा भाजपा उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) जी यांच्या प्रचारार्थ मुंबईतील साकी नाका परिसरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी, बोलताना उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांच काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसकडून पुलवामा आणि 26/11 च्या हल्ल्याबाबत होत असलेल्या टीकेवरुन प्रत्त्युतर दिलं. निकम यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेतून काँग्रेसवर पाकिस्तनाच्या (Pakistan) भाटगिरीचा आरोप केला आहे. तर, उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळेच मी पाकिस्तानचा या घटनेत हात असल्याचं सिद्ध करू शकल्याचं निकम यांनी म्हटलं.
15-20 दिवसांपूर्वीची गोष्ट होती, मी राजकारणात येईन की नाही माहिती नव्हते. मात्र, माझ्या अनेक मित्रांनी मला सागितले मन बना लो, त्यानंतर मी निर्धार केला आणि राजकारणात येण्याचं ठरवलं असे म्हणत भाजपाचे उमेदवार आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मी देशभक्त आहे असे मी मानतो आणि त्याप्रमाणे कार्य करतो, म्हणूनच मी आज देशभक्तांच्या पार्टीत आलो. मी भाजपमध्ये आल्याने अनेकांना मिर्ची झोबली, कसाबने कबुली जबाबात म्हंटले होते मीच येथील लोकांना मारले. याप्रकरणाच्या तपास आणि खटल्यातील घडामोडींवेळी मी स्वतः पाकिस्तानमध्ये जाऊन आलो. त्यावेळी, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे वाचनही पाकिस्तानमध्ये केल्याची आठवण उज्ज्वल निकम यांनी सांगितली.
उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदाच थेट काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. पाकिस्तानची भाटगिरी काँग्रेस नेहमी करतेय. न्यायालयाने दिलेला निकाल तुम्हाला मंजूर नाही, तुम्ही कुणाची भाटागिरी करता? असा सवाल विचारत निकम यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. तसेच, 26/11 आणि अजमल कसाब प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी केवळ देवेंद्र फडणवीसांमुळेच पाकिस्तानचा या हल्ल्यात हात होता हे मी सिद्ध करू शकलो, असे निकम यांनी म्हटंल.
काँग्रेसचे रहस्य माझ्याकडे आहेत
26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो. याप्रकरणी डेव्हिड हेडलीने शिवसेना भवनचे देखील फोटो काढले होते. मात्र, काँग्रेसकडून वारंवार शहिदांचा अवमान केला जात आहे. काँग्रेस नेते देशाची क्षमा का मागत नाही, शहिदांच्या कुटुंबाची का क्षमा मागत नाही, असा सवाल निकम यांनी विचारला. तर, काँग्रेसचे देखील रहस्य माझ्याकडे आहेत, पण झाकलेली मूठ सव्वा लाखाची म्हणून शांत बसतोय, अशा शब्दात काँग्रेस नेत्यांना उज्ज्वल निकम यांनी इशाराही दिला.