मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची एका ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. आता, या व्हिडिओ क्लीपवरुन मनसे आणि आव्हाड यांच्यातच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेच्या संदीप देशपांडे यांच्याकडून ही ऑडिओ क्लिप ट्वीट करण्यात आली होती. त्यानंतर, ही क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून जितेंद्र आव्हाड यांनीही ती पाहिली आहे. हो, मी ती व्हिडिओ क्लीप पाहिली आहे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी व्हायरल क्लीपवरुन थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरच हल्लाबोल केला आहे. दरम्यान, व्हायरल व्हिडिओ क्लीपमध्ये, जितेंद्र आव्हाड हे मल्लिकार्जुन पुजारी यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. जाऊ दे, मरु दे तिला, तू कशाला बदनाम होतो? असा संवाद यात पाहायला मिळत आहे. त्यावरुन आता राजकारण सुरु झालं असून आव्हाड यांनी ठाकरेंना थेट सुपारी ठाकरे असं म्हटलंय.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या व्हायरल क्लीपमुळे आता मनसे (MNS) आणि आव्हाड यांच्यातच खडाजंगी होणार असल्याचे दिसून येते. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा एक ऑडिओ शेअर केला आहे. यात जितेंद्र आव्हाड हे मल्लिकार्जुन पुजारी नामक व्यक्तीशी संवाद साधताना दिसत आहेत. त्यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, ही ऑडिओ क्लिप 4 वर्षांपूर्वीची असल्याचे बोललं जात आहे. आता, पाच सहा वर्षांपूर्वीच्या ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरच गंभीर आरोप केले आहेत. आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणारच ना, तुमचं नावच सुपारी आहे, सुपारी ठाकरे असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं.
बदलापूर प्रकरणातून पळ काढता येणार नाही
तत्कालीन परिस्थिती काय होती हे कोणालाच माहीत नाही आणि नसतं, जर सत्याची बाजू होती तर पोलिसांनी केस रजिस्टर का नाही केली. फिल्म इंडस्ट्रीमधल्या टी सिरीजच्या मालकाबरोबर हे ब्लॅकमेलिंग केलं जात होतं. बदलापूर प्रकरणातून यांना पळ काढता येणार नाही, माझ्या ऑडिओ क्लिप चालवून मला जेवढं बदनाम करायचं आहे, तेवढं करा. याचा अर्थ जितेंद्र आव्हाडचा काटा कुठेतरी रुततोय. हे प्रकरण मनसेकडे जाऊ द्या किंवा कोणाकडेही जाऊ द्या, असे सुपारी घेणारे खूप आहेत असे म्हणत आव्हाड यांनी राज ठाकरेंवरच हल्लाबोल केला.
राज ठाकरेंनीच माझा आवाज काढला
राज ठाकरे बदलापूरला आतापर्यंत का गेले नाहीत,अशा प्रकरणात माणुसकीच्या नात्याने 24 तासात पोहोचायला हवं. मराठी मनाचा अभिमान असणारे राज ठाकरे तुमचा हात त्या पोरीच्या आईच्या डोक्यावरुन, पोरीच्या बापाच्या डोक्यावरुन फिरवायला हवा होता, आणि माझ्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतात, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. तसेच, मी जर सांगितलं की, माझा हा आवाजच नाही तर हे काय तपासायला जाणार आहेत? मी सांगतो हा माझा आवाजच नाही, राज ठाकरे कोणाचाही आवाज काढतात त्यांनीच माझा आवाज काढून क्लिप तयार केली, तुम्हाला माहित आहे ते किती मोठे मिमिक्री आर्टिस्ट आहेत, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
हेही वाचा
जिगरबाज... सर लवकर बरं व्हायचंय, त्यांना पकडायचंय; पुण्यातील जखमी पोलीस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा