Teachers Constituency Elections Nagpur : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसोबत चर्चा करुन काल, बुधवारी (18 जानेवारी) नागपूर विभाग शिक्षक निवडणुकीतील उमेदवाराला समर्थन जाहीर करणार होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत काँग्रेसने कोणाच्याच नावाची अधिकृत घोषणा केली नव्हती. या घोळामुळे सारेच बुचकळ्यात पडले आहेत.


नागपूर आणि नाशिकच्या जागेसंदर्भात मुंबई येथे महाविकास आघाडीची बैठक झाली. आज, गुरुवारी (19 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करुन नागपूरमधील काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. नागपूरची जागा शिवसेनेसाठी सोडल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर दबाव टाकून शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांना माघार घ्यायला लावली. काँग्रेसने नाशिकची जागा शिवसेनेसाठी सोडली त्या बदल्यात नागपूरची जागा मागून घेतली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी अडबाले यांना समर्थन जाहीर करावे यासाठी आग्रह धरला आहे.


दरम्यान, शिक्षक भारतीचे नेते आमदार कपिल पाटील (Kapil Patil) दोन दिवस विदर्भात तळ ठोकून होते. झाडे यांना समर्थन जाहीर करावे यासाठी अनेक नेत्यांसोबत चर्चा केली. पदवीधर निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र त्याला कोणी फारसा प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे केदार आणि वडेट्टीवार यांनी परस्पर समर्थन जाहीर केल्याने कपिल पाटील नाराज होऊन निघून गेले.


काँग्रेस नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर


सुनील केदार (Sunil Kedar) आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना समर्थन जाहीर करण्याचा अधिकार दिला कुणी, असा सवाल उपस्थित करुन माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आपला पाठिंबा शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना असल्याचे जाहीर केले. यामुळे काँग्रेसमधील वाद आणखीच चव्हाट्यावर आले आहेत. माजी मंत्री व आमदार सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी (19 जानेवारी) शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सुधाकर अडबाले यांना काँग्रेसचे समर्थन असल्याचे जाहीर केले होते. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र अनुपस्थित होते. पटोले बुधवारी मुंबई येथे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसोबत चर्चा करुन उमेदवार घोषित करणार होते. त्यापूर्वी एक दिवसाआधीच केदार आणि वडेट्टीवार यांनी उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे कोणाला समर्थन द्यायचे यावरुन काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे समोर आले.


ही बातमी देखील वाचा...


Nagpur Metro : मेट्रोची 10 रुपये प्रवास स्कीम बंद; आता किलोमीटरनुसार द्यावे लागणार भाडे