छत्रपती संभाजीनगर: येत्या सोमवारी शिंदे गटात बड्या नेत्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत. यापैकी एक नेता छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे. हे नाव म्हणजे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) असल्याची चर्चा गेल्या काही तासांपासून रंगली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केले. ठाकरे गटाचे नेते तुमच्या संपर्कात आहेत का? शिवसेनेच्या नेत्यांशी त्यांची बोलणी सुरु आहेत का?, असा प्रश्न शिरसाट यांना विचारण्यात आला. यावर शिरसाट यांनी म्हटले की, मुळात आम्ही इतर पक्षातील नेत्यांना आमच्या पक्षात येण्यासाठी पायघड्या घालत आहोत, असा प्रकार नाही. जे मुळात शिवसैनिक आहेत आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना वाढवण्याचे काम केले, त्यांची सध्या पक्षात कोंडी होत आहे. पक्षात नवीन आलेले लोक त्यांच्यावर बॉसगिरी करत आहेत. या नव्या नेत्यांना पक्षात प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नेतेपद दिले जाते. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याचा परिणाम पक्ष सोडण्यामध्ये होतो. त्यामुळे हे नेते शिवसेना सोडत नाहीत तर खऱ्या शिवसेनेमध्ये येत असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले.
छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजपचा उमेदवार नसेल: संजय शिरसाट
संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीत कोणाच्या वाट्याला जाईल, असा प्रश्न विचारण्यात आला. संभाजीनगरमध्ये महायुतीचा उमेदवार भाजपचा नसणार, हे निश्चित आहे. शिंदे गटात संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागेसाठी चार जण इच्छूक आहेत. यापैकी दोन जण म्हणजे संदिपान भुमरे, राजेंद्र जंजाळ हे आहेत. तर दोन संभाव्य उमेदवारांची नावं सध्या गुप्त ठेवली आहेत. ती नावं आताच सांगता येणार नाहीत, असे शिरसाट यांनी म्हटले. पण सोमवारी शिंदे गटात प्रवेश करणारा नेता हाच छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार असेल का? तो नेता म्हणजे अंबादास दानवे आहेत का?, असे प्रश्न शिरसाट यांना विचारण्यात आले. त्यावर शिरसाट यांनी सांगितले की, सोमवारी पक्षप्रवेश करणारा नेता कोणीही असू शकतो. तोच छ. संभाजीनगर लोकसभेचा उमेदवार असेल का, त्याबद्दल आता सांगता येणार नाही, असे शिरसाट यांनी म्हटले. शिरसाट यांनी कुठेही अंबादास दानवे आमच्या पक्षात येणारच नाहीत, असे ठामपणे नाकारले नाही. परंतु, महाराष्ट्रात सोमवारी राजकीय भूकंप होणार, हे माझे वक्तव्य संभाजीनगरपुरते मर्यादित आहे. माझ्या वक्तव्याने ठाकरे गटात गोंधळ उडाला. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंच्या वादाचा आणि माझ्या वक्तव्याचा काहीही संबंध नाही. परंतु, उबाठा गटात प्रचंड असंतोष आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
आणखी वाचा