Akola News : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokat) यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. माणिकराव कोकाटेंना फक्त दोन वर्षांची शिक्षा असल्याने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. तर एकीकडे त्यांना अटकेची भीती असताना दुसरीकडे त्यांची आमदारकी देखील धोक्यात आहे. अशातच आता माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रीपदी राज्यमंत्री इंद्रनील नाईकांना (Indranil Naik) 'कॅबिनेट' (Cabinet) मंत्री पदावर बढती मिळण्याची शक्यता आहे.
सोबतच इंद्रनील नाईकांचे राज्यमंत्रीपद सना मालिकांना (Sana Malik) मिळणार असल्याची चर्चा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापुर्वी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा खांदेपालट होणार, अशी 'एबीपी माझा'ला राष्ट्रवादीतील विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.
Ajit Pawar NCP : राष्ट्रवादीत चुरस, मंत्रीपदावर वर्णीसाठी जोरदार लॉबिंग
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर वर्णी लागण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी चुरस बघायला मिळते आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे यांची मंत्रीपदावर वर्णीसाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याचे बोललं जात आहे. तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि मावळचे आमदार सुनिल शेळकेही यासाठी उत्सुक आहे. मात्र, सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींशी असलेल्या संबंधांमुळे धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.
Indranil Naik : इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्याच्या विचारात पक्ष
मराठवाड्यातील मराठा समाजात याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने धनंजय मुंडेंचे नाव मागे पडण्याची शक्यता आहे. इतर संभाव्य नावावरही पक्षात मत-मतांतरे असलायची चर्चा आहे. या परिस्थितीत पक्षाच्या शिर्षस्थ नेतृत्वाचा संभाव्य 'प्लॅन' 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. पक्ष इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्याच्या विचारात आहे. तर माणिकराव कोकाटेंची खाती इंद्रनील नाईकांना मिळण्याची शक्यता आहे. इंद्रनील यांच्या रूपाने बंजारा समाजातील तरूण नेतृत्वाला आणखी मोठी संधी देण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे. इंद्रनील नाईक सध्या उद्योग, मृद आणि जलसंधारण, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण आणि पर्यटन अशा सहा महत्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून विदर्भाला कॅबिनेट मंत्रिपद देत जनाधार बळकट करण्याची राष्ट्रवादी मनिषा असल्याचे बोललं जातंय.
Maharashtra Politics : अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी मंत्र्यांचा खांदेपालट आणि शपथविधी?
राष्ट्रवादीकडून विदर्भात इंद्रनील यांच्या रूपाने फक्त एकच राज्यमंत्री आहे. तर, कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाल्यामुळे इंद्रनील नाईकांच्या रिक्त होत असलेल्या राज्यमंत्री पदावर मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांना पक्ष संधी देण्याच्या विचारात आहे. सना मलिक यांच्या रूपाने मुस्लिम, महिला आणि तरूण या तिन्ही घटकाला प्रतिनिधित्व देण्याचा पक्षाचा मानस आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर फेब्रुवारी 2026 ला होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्र्यांचा खांदेपालट आणि शपथविधी होणार असल्याची राष्ट्रवादीतील विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.