Winter session of Parliament: अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. यावर विरोधी पक्ष सभागृहात चर्चा करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी सोमवारी राज्यसभेतून सभात्याग केला. विरोधकांच्या या भूमिकेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले आहेत की, "काँग्रेस पक्ष या मुद्द्यावर राजकारण करत आहे. संसदेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, यूपीएची सत्ता असतानाही अशा संवेदनशील विषयांवर चर्चा झाली नाही. एकीकडे लष्कर सीमेवर खंबीरपणे उभे आहे, तर राहुल गांधी अशी वक्तव्य करून लष्कराचे मनोधैर्य खचविण्याचे काम करत आहेत.''


संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेतील (Rajya Sabha) विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, चीन आमच्या जमिनीवर कब्जा करत आहे. या विषयावर आपण चर्चाच करणार नाही तर आणखी कशावर चर्चा करणार? या विषयावर सभागृहात चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. भारत-चीन सीमा वादावर (India-China Border Clash)  चर्चा करण्याची नोटीस फेटाळल्यामुळे विरोधी पक्षांनी राज्यसभेतून (Rajya Sabha)  सभात्याग केला.


Winter session of Parliament: चीन सीमेवर कथित बांधकामाचा मुद्दा झाला उपस्थित 


काँग्रेस नेते प्रमोद तिवारी (Pramod Tiwari) यांनी सोमवारी (19 डिसेंबर) राज्यसभेत चीन सीमेवर कथित बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. चीनसोबतच्या सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी राज्यसभेत नियम 267 अंतर्गत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस दिली होती.


Winter session of Parliament: राहुल गांधींनी काय केले होते आरोप?


चीन युद्धाच्या तयारीत आहे, तर भारत सरकार झोपेत असून धोक्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. चीनने भारताच्या 2 हजार चौरस किलोमीटर भूभागावर कब्जा केल्याचा आरोपही त्यांनी केला. 


दरम्यान, अरुणाचल प्रदेशात भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या चकमकीबाबत राहुल गांधींवर भाजपने हल्लाबोल केला आहे. भाजपने शनिवारी जोरदार हल्ला चढवला आणि काँग्रेसने त्यांना तात्काळ पक्षातून काढून टाकावे, असे म्हटले आहे. त्याचवेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधी चीन आणि पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधी फक्त भारतीय लष्कराचा अवमान करत नसून देशाच्या प्रतिमेलाही हानी पोहोचवत असल्याचा आरोप केला.