Aditya Thackeray: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी स्थानिक सभांना संबोधित करताना आदित्य ठाकरे विरोधकांचा चांगलाच समाचार घेताना दिसत आहेत. अशातच आज एक सभेत लोकांना संबोधित करताना त्यांनी भाजपाला इशारा दिला आहे की, ''महाराष्ट्र झुकणार नाही, प्रेमानं बोलायला आलात तर बाजूला बसू. वार करायला आलात तर सहन करणार नाही.'' त्यांच्या याच वक्तव्यावर एबीपी माझाने प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. जे घडतंय ते चुकीचं आहे. आम्ही कोकण दौरा केला तो विकासासाठी केला होता. राजकीय भाषेसाठी नाही.'' यावेळी कोकण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी 'एबीपी माझा'ला विशेष मुलाखत दिली आहे.
प्रश्न: मग हा रोष राग विरोधकाबद्दल का आला?
- बाळासाहेबांनी शिकवलं आहे, राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचं आहे. आता कसलं राजकारण सुरू आहे, हे सर्वांना माहित आहे. आपण युवा पिढीला काय देतोय हे महत्वाचं आहे.
प्रश्न: मामांची संपत्ती जप्त केली, ईडी थेट मातोश्रीच्या दरवाज्यात आली. याकडे कसं बघायचं? एक्स्पोज केलं जातंय?
- एक्सपोज कोण होतंय हे मी सांगायची गरज नाहीय. कोण कोणाला धमक्या देतंय. केंद्रीय यंत्रणा प्रचार यंत्रणा म्हणून काम करत आहेत. आम्ही अशाना घाबरणार नाही आम्ही विकासांचे काम करत राहणार.
प्रश्न: मुख्यमंत्री विधिमंडळात जे बोलले त्यानं शिवसैनिकांना बळ मिळेल का?
- विरोधी पक्षात नैराश्य आलं आहे. सत्ता गेल्यानंतर सध्या चिंतेत आहेत. पण सत्ता येत जात असते. निवडणुका झाल्या की, विकास सुरू करायचा असतो. लोकांची सेवा करण्याचा हा काळ असतो.
प्रश्न: कोकणात अनधिकृत बांधकाम तोडायला राजकीय लोक आले होते. हे योग्य आहे का? भविष्यात ही परंपरा होईल का?
- कोकणात आता संघर्षांचा काळ संपला आहे. आता विकासाचे दिवस सुरू झाले आहेत. मी दौऱ्यावर येण्याआघी खुप काही ऐकलं होतं. पण दौरा सुरळीत पार पडला. त्यामुळे कोकण आणि संघर्ष असा उल्लेख केला जातो. त्यामुळे मी या प्रश्नाचं उत्तर देणार नाही.
प्रश्न: रिफायनरी बाबतची शिवसेनेची भूमिका काय?
- महाराष्ट्राला विकास पाहिजे आहे. चांगले उद्योग इकडे आले, रोजगार उपलब्ध झाले, तर आम्हाला प्रकल्प पाहिजे आहेत. नाणार जाणार हे, आम्ही बोललो होतो. ते आम्ही केलं आहे. सगळ्यांना सोबत घेऊन कोणाचाही विश्वास न तोडता आम्ही काहीही करणार नाही.
प्रश्न: हिदू सणांना परवानगी दिली जात नाही?
- जात पात धर्म आपण पाहत नाही, जे बोलत आहेत ते राजकारण करत आहेत. सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कोविड अजून गेलेला नाहीय. त्यामुळे सर्व गोष्टी बघूनच निर्णय घेतले जातील.