Raj Thackeray Interview: मुंबईच्या विलेपार्लेमध्ये 'हर हर महादेव' चित्रपटानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावे यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी आपलं चित्रपट प्रेम आणि इतर अनेक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. या चित्रपटाला राज ठाकरे यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी हा चित्रपट हिंदी आणि मराठीत डबिंग करण्यासाठी तब्बल 17 दिवस दिले असल्याचं सुबोध भावे म्हणाले आहेत.  


स्वरराज ते राज ठाकरे


राज ठाकरे यांचं खरं नाव हे स्वरराज होत, मग ते आता राज कसं, असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, माझं नाव स्वरराज.. माझ्या वडिलांना खूप अपेक्षा होत्या माझ्याकडून, त्यांना अपेक्षा होती, की मी संगीतात काहीतरी करेल. त्यांनी खूप प्रयत्न केले. अनेक वाद्य वाजून घ्यायचे. पण मी जेव्हा व्यंगचित्र काढायला लागलो, तेव्हा मी स्वरराज नावाने मी चित्र काढत होतो. एकेदिवशी बाळासाहेबांनी सांगितलं की, मी बाळा ठाकरे नावाने सुरुवात केली. तू राज ठाकरे नावाने सुरुवात करायची. त्यानंतर माझं हे दुसरं बारसं कॉलजमध्ये असताना झालं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.     


पहिल्यांदा 2003 मध्ये व्हॉईस ओव्हर केलं : राज ठाकरे 


हर हर महादेव हा पहिला मराठी चित्रपट आहे, जो पाच भाषेत येणार आहे. यात मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या भाषेचा समावेश आहे. यावेळी व्हॉईस ओव्हर देण्यासाठी 'हर हर महादेव' हा चित्रपटच का निवडला, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला, यावर ते म्हणाले की, ''मी पहिल्यांदा 2003 मध्ये व्हॉईस ओव्हर केलं. जेव्हा बाबासाहेब पुरंदरे यांची मुलखात रायगडावर घेण्यात आली होती. त्यावेळी अचानक माझ्यावर ती जबाबदारी आली.'' ते म्हणाले, ''व्हॉईस ओव्हर करणं हे माझं काम नाही. 2003 मध्ये त्या मुलाखतीत मी केलं. मात्र त्याला काही अर्थ नव्हता. पहिल्यांदा करत असताना मी वाचल्यासारखं केलं. मात्र 2004 ला मी शिवसेनेचा प्रचार केला होता. त्यात आम्ही नऊ फिल्म केल्या. त्या संपूर्ण नऊ फिल्मचा आवाज अजित भुरे यांचा होता. या सर्व अॅड फिल्म होत्या. त्यातली एक फिल्म मुंबईच्या बॉम्ब ब्लास्टची फिल्म होती. जी निवडणूक आयोगाने रद्द केली. त्या शॉर्ट फिल्मला सुरुवातीच्या एका सीनमध्ये बस जाते, त्यात मी बोललो  'मुंबई', बाकी सर्व आवाज हा अजित भुरे यांचा होता. फिल्म झाल्या. नंतर आम्ही त्या बाळासाहेबांना दाखवल्या, तेव्हा मी आणि अजित भुरे होतो. त्यावेळी त्यांनी अजितला विचारलं मुंबई कोण बोललं. अजित भुरे म्हणाले राज बोलला आहे. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, मला वाटलंच.''      


'हर हर महादेव' या चित्रपटात आवाज देण्याबद्दल राज ठाकरे म्हणाले, ''मी अभिजित देशपांडे यांना सांगितलं होत की, तुम्ही माझा आवाज बोलत आहोत. मात्र सर्वात बुलंद आवाज हा शरद केळकर यांचा आहे. यावर सुबोध भावे म्हणाले, ''ते चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करत आहे. म्हणून आम्हाला दुसरा आवाज हवा होता आणि तुमच्या सारखा दुसरा बुलंद आवाज नाही.''   


किआनला शिवाजी महाराजांची कोणती गोष्ट सांगणार?


किआनला गोष्ट सांगायची असल्यास, शिवाजी महाराजांची कोणती गोष्ट सांगणार? असं प्रश्न राज ठाकरे यांना विचारला असता ते म्हणाले, ''मुलगा असल्याने आणि त्यात ठाकरे असल्याने त्याला लढाया सांगाव्या लागतील, असं मला वाटतं नाही. मोठा झाला की त्याला सांगेन इतर कोष्ठीही. मला असं वाटतं, शिवाजी महाराजांना जिजामातांनी रामायण आणि महाभारतातील कथा ऐकवल्या. तो जो संस्कार, तोच संस्कार पुढे सुरू ठेवायला हवा, असं मला वाटतं.''