नाशिक : राज्यातील जनतेचं मत होतं कि आदिवासी विकास मंत्री हा आदिवासी समाजाचाच व्हायला हवा होता. प्रचारादरम्यान मी सांगीतलं होतं कि आदिवासी आहे म्हणून आदिवासी मंत्री बनवायचं का? तसं मी कुठलेही मंत्रीपद सांभाळू शकतो. त्यानंतर महायुतीच्या सगळ्याच नेतेमंडळीनी, देवेंद्र फडणवीससह अजित पवार यांनी देखील अन्न औषध प्रशासन हे खाते मला दिले, ते मी महत्त्वाचं खातं म्हणून बघतो. या खात्यात मनुष्यबळ कमी आहे. साधने नाहीत टेस्टिंग लॅब फक्त तीन आहे आणि अनेक चॅलेंज आहेत. यामुळे विनोदा खातिर मी म्हणतो 288 चे सभागृह चालवले, मी राज्यही चालवू शकतो, अशा मिश्किल शब्दात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्य चालवायला चांगल्या खात्याचा मंत्री झालं असं होत नाही. खाती कोणतीही वाईट नाही. सगळी खाती जनतेसाठी निर्माण केलेली आहे. हे खाते देखील मला मुख्यमंत्र्यासारख वाटतं असेही ते म्हणाले.
अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर....
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील याची चर्चा आहे. याबद्दल काय होईल ते सांगता येणार नाही. माझी भूमिका महायुती बरोबर आहे आणि त्यांच्याबरोबरच राहणार. अजित पवार व शरद पवार एकत्र आले तर चांगलेच होईल. राजकारण काही दिवसापुरते आहे. मात्र वैयक्तिक संबंध आपले असतात, सकाळ संध्याकाळ ते पक्ष म्हणून राहत नाही. पालकमंत्री संदर्भात बोलायचे झाले तर 13 जिल्ह्यात आदिवासी भाग आहे. त्यापैकी समाज काही ठिकाणी मागे आहे आणि त्यासाठी गोंदिया, नंदुरबारसारखे कुठेही पालकमंत्री उद्या अशी मागणी माझी असल्याचे ही मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले.
साई संस्थानाच्या प्रसादाबाबत असं बोलणं योग्य- नरहरी झिरवाळ
साई संस्थानाच्या प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करा. अशी मागणी माजी खासदार सुजय विखेंनी साई संस्थान प्रशासनाकडे केली आहे. जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे आमच्या मुला- मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावा अशी मागणी सुजय विखेंनी केली आहे. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्टातील सगळे भिकारी इथे गोळा झालेत, हे योग्य नाही. असेही सुजय विखे म्हणालेत. यावर बोलतांना मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, भाविक श्रद्धा म्हणून प्रसाद त्या ठिकाणी घेतात, याचा अर्थ भिकारी होत नाही. जे दानशूर आहे तेही लाईनमध्ये उभे राहून प्रसाद घेतात. त्यामुळे असं बोलणं योग्य नसल्याचे ते म्हणाले.
आणखी वाचा