सांगली: साधेपणा हे आपले वैशिष्ट्य आहे. ब्राह्मण समाज चुकत असेल तर जरूर ऐकून घ्या. त्यामध्ये दुरुस्ती करा. पण विनाकारण कोणी शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचे नाही, असे वक्तव्य भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी केले. त्या शुक्रवारी ब्राह्मण समाजाच्या (Brahmin community) वतीने सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. गणपती मंदिर परिसरातील श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी मेधा कुलकर्णी यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली. 


मेधा कुलकर्णी यांनी अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्याबाबत या कार्यक्रमात केलेले भाष्य चांगलेच गाजत आहे. मेधा कुलकर्णी यांनी म्हटले की,  विनाकारण कोणी आपल्या शेपटीवर पाय देत असेल तर सोडायचे नाही. त्यामुळेच पुरोहितांची, आपल्या मंत्रांची चेष्टा करणारे आमदार अमोल मिटकरी ज्या व्यासपीठावर असतील त्या व्यासपीठावर मी जाणार नाही, असा पवित्रा आपण घेतल्याचे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. मिटकरी बारामतीमध्ये ज्या स्टेजवर येणार होते, त्या स्टेजवर मी येणार नाही अशी भूमिका घेतल्यावर मिटकरीच त्या सभेला आलेच नाहीत. त्यामुळे जे चुकीचे आहे, त्याला चुकीचे म्हणा, असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.


देशाला पुढे नेण्यासाठी एकटे मोदी, फडणवीस पुरणार नाहीत; सर्वांना एकत्र काम केलं पाहिजे: मेधा कुलकर्णी


सांगलीत ब्राह्मण समाज संघटनेतर्फे ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांचा सत्कार खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. त्यावेळी मेधा कुलकर्णी विविध विषयांवर बोलत होत्या.  देशातील सर्व हिंदूंना एकत्र करायचे आहे. देशाला पुढे नेण्यासाठीच्या कामासाठी एकटे मोदी, फडणवीस पुरणार नाहीत. सर्वांनी देशासाठी काम करायला पाहिजे. प्रश्न समजून घेऊन देशाला पुढे नेऊया असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले. ब्राह्मण समाज चुकत असेल तर जरूर ऐकून घ्या. त्यामध्ये दुरुस्ती करा. मात्र, विनाकारण कोणी शेपटीवर पाय दिला तर सोडायचे नाही असेही मेधा कुलकर्णी म्हणाल्या. ब्राह्मण समाज साडेतीन टक्के आहे. त्यांच्यावर विविध कारणातून टीका होत असते. ब्राह्मण समाजावर होणारी टीका व नकारात्मक भावना कामाच्या माध्यमातून नष्ट करा असे आवाहन खासदार मेधा कुलकर्णी यांनी केले. यावेळी श्रीमंत पुष्कर सिंह पेशवे, युवराज श्रीमंत आदित्य राजे विजयसिंह पटवर्धन ,श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, राज लक्ष्मी राजे पटवर्धन आदी उपस्थित होते.


आणखी वाचा


'अमोल मिटकरी असतील तर मी स्टेजवर येणार नाही'; मेधा कुलकर्णी यांनी बारामतीमधील सभेचा सांगितला किस्सा