दापोली: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मी उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला होता. तुम्ही काँग्रेसची साथ सोडा, मी दोन तासांमध्ये आमदारांना परत आणतो, असे मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सांगितले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचे ऐकले आणि ते काँग्रेससोबत राहिले, असे वक्तव्य रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केले. ते शुक्रवारी दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.


यावेळी रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. गद्दारीची व्याख्या काय आहे, हे अनेकांना अद्याप कळलेले नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली. शिवसेनचे आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता. मी खोटं बोलत नाही, गणपतीची शपथ घेऊन सांगतोय. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांना म्हटले की, काँग्रेस पक्षाची साथ सोडा, मी दोन तासांमध्ये सगळे आमदार परत आणतो. पण उद्धव ठाकरे यांनी माझे ऐकले नाही, असे रामदास कदम यांनी म्हटले. शिवसेना का सोडली यावर मी पुस्तक लिहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांनी भाजपवर आगपाखड केली होती. मात्र, या कार्यक्रमात त्यांचा भाजपबाबतचा सूर काहीसा मवाळ झालेला दिसला. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. आम्हाला महायुती टिकवायची आहे. जो चुकला त्याला सोबत घेऊन जायचं आहे. आमचं एकच ध्येय आहे. आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला विकास करायचा आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले.


दापोलीत योगेश कदमांसमोर विधानसभेला चुलत भावाचे आव्हान?


आगामी विधानसभा निवडणुकीत रामदास कदम याचे पुत्र योगेश कदम यांच्यासमोर दापोली मतदारसंघात नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत सख्खा चुलत भाऊच योगेश कदम यांच्या विरोधात काम करेल, अशी शक्यता आहे. उद्योजक सदानंद कदम यांचा मुलगा अनिकेत कदम दापोली विधानसभा मतदार संघात ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या समोर भाऊबंदकीचे  आव्हान उभे ठाकणार आहे. अनिकेत कदम यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. संजय कदम यांना निवडून आणण्यासाठी काम करण्याचा निर्धार अनिकेत कदम यांनी  केल्याचे सांगितले जाते.  


आणखी वाचा


शिंदे साहेब विधानसभेला मोदी-शाहांकडून 100 जागा मागा, वाटल्यास मला मोदी साहेबांकडे घेऊन चला: रामदास कदम