मुंबई: मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याबाबत कधीही मुलगी-पुतण्या असा भेद केला नाही. सुप्रिया सुळे आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणातच आहेत. त्यांना कधीही सत्तापद देण्यात आले नाही. याउलट अजित पवार (Ajit Pawar) यांना कायमच सत्तापदे देण्यात आली, असे सांगत शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजितदादा गटाकडून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांनी स्वत:च्या मुलीसाठी पुतण्या असलेल्या अजित पवार यांना डावलले, असा आरोप भाजप आणि अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जातो. दैनिक 'लोकसत्ता'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी या आरोपाला सविस्तर प्रत्युत्तर दिले.
शरद पवार यांनी मुलाखतीमध्ये अजित पवार यांना पक्षाने कशाप्रकारे महत्त्वाची पदं दिली होती, याचा पाढा वाचला. अजित पवार यांना राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदे, महत्त्वाची खाती, तीनवेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्वकाही देण्यात आले. सुप्रिया सुळे यांना फक्त खासदारकी दिली असून त्या दिल्लीच्या राजकारणात आहेत. सुप्रिया यांना कधीही सत्तापद देण्यात आले नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
अजित पवारांच्या भूमिकेची शरद पवारांकडून चिरफाड
अजित पवार यांनी भाजपसोबत जाताना आणि अलीकडच्या काळात वारंवार विकास करण्यासाठी सत्ता कशाप्रकारे महत्त्वाची आहे, हे मतदारांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवार यांनी अजित पवार यांची ही भूमिका खोडून काढली. ते म्हणाले की, सत्तेत असल्याशिवाय जनतेची कामे करता येत नाहीत, दाव्यात तथ्य नाही. विरोधी पक्षनेत्याचे पद आणि विरोधी पक्षही लोकशाहीत कायम महत्त्वाचा असतो. माझ्या 56 वर्षांच्या कारकीर्दीत मी केवळ 20 वर्षे सत्तेत होतो. उर्वरित काळ मी विरोध पक्षात घालवला. एस.एम. जोशी, कृष्णराव धुळप, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या नेत्यांनी विरोधी पक्षात राहून आपले स्थान निर्माण केले. बॅरिस्टर पै नाथ बोलायला उभे राहिल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरुही थांबून त्यांचे भाषण ऐकायचे. परंतु, राष्ट्रवादीचे काही नेते सत्तेविना राहू शकत नव्हते. त्यांनी पाच वर्षे विरोधात काढली होती. या मंडळींना भाजपसोबत जाण्याची घाई झाली होती. पण मी त्यांना सांगितले होते की, पाहिजे तर तुम्ही जा, मी येणार नाही.
अमोल मिटकरींचा शरद पवारांना सवाल
शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर अजितदादा गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या जागा जास्त आलेल्या असतानाही शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिला नाही?, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. शरद पवारांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पक्षाकडे अनुभवी चेहरा नसल्याने तेव्हा मुख्यमंत्रीपदावर दावा केला नसल्याचं म्हटले होते. त्यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. कोणत्याही सभागृहात कसल्याही कामाचा अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी कुणी पुढाकार घेतला?काँग्रेसने महाराष्ट्रावर लादलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना विरोध का झाला नाही? 2004 ला राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता की असलेल्या उमेदवाराला मुख्यमंत्री करायचेच नव्हते?, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
अजित पवार पुन्हा गायब, राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा; शरद पवारांनी दिलंय 'हे' उत्तर