बीड: राज्यात लोकसभा निवडणुकीचे चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या मतदानावेळी पैसे वाटल्याचे आणि मतदारांवर दबाव आणण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. या घटना ताज्या असतानाच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ बीडच्या परळी (Parli News) येथील असल्याचे सांगितले जाते. या व्हीडिओत एका मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्राजवळ उभे असलेल्या मतदाराला एक व्यक्ती सूचना देताना दिसत आहे. संबंधित व्यक्ती मतदारांना कोणते बटन दाबा, हे सांगताना दिसत आहे. यावर रांगेत उभे असलेले इतर मतदार ज्याचे मतदान त्यांना करु द्या, असे सांगत आहेत. मात्र, तरीही मतदारांना (Beed Voting) सूचना देणारी व्यक्ती तिथेच उभे राहून मतदारांना सूचना देताना दिसत आहे. यावरुन रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.


बीड जिल्ह्यात विशेषता परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे?, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.


बारामतीत पैसे वाटपाचे आरोप


बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या आदल्या दिवशी अजितदादा गटाने मोठ्याप्रमाणावर पैसेवाटप केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवार यांनी बारामतीत पैसे वाटप सुरु असतानाचे काही व्हीडिओ शेअर केले होते. याशिवाय, मतदानाच्या दिवशी पहाटेपर्यंत वेल्हा येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC Bank) उघडी होती, याचाही व्हीडिओ रोहित पवारांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. यावरुन बराच गदारोळ झाला होता. 


 




बीड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान


बीड लोकसभेला झालेल्या सर्वाधिक मतदानाने सुद्धा राजकीय चर्चा रंगली आहे. बीड लोकसभेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे रिंगणात आहेत. बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक 74.19 टक्के मतदान झाले. तर तुलनेत कमी मतदान बीड विधानसभा मतदारसंघात 66.09 टक्के इतके मतदान झाले. गेवराई मतदार संघामध्ये 71.43 टक्के, केजमध्ये 70.31 टक्के, माजलगावमध्ये 71. 61 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. परळीमध्ये 71.31 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 


आणखी वाचा


अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...