कोल्हापूर: राज्यातील हाय होल्टेज लढतींपैकी एक लढत म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ (Hatkanangale Lok Sabha Constituency). हातकणंगलेत आज मतदान होत असून काही तासांमध्येच उमेदवारांचं भवितव्य हे मतदानपेटीत बंद होणार आहे. सुरूवातीला शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानीचे राजू शेट्टी अशी लढत होणार असं चित्र होतं. पण शिवसेना ठाकरे गटाने आपला शिलेदार रिंगणात उतरवला आणि सगळं राजकीय गणितच पालटल्याचं दिसतंय. ठाकरेंनी शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजीत पाटील हा नवा चेहरा दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच इथे तळ ठोकावा लागला. मोदी-शाह आणि योगींनी सभा घेतलेल्या या मतदारसंघात अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं दिसतंय. 


आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी तर कोल्हापूरचे पाच दौरे केले, अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि राजकीय बेरजा केल्याचं समोर आलं. तर दुसरीकडे धैर्यशील माने यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांनीही सभा घेतल्या आहेत.


सत्यजीत पाटलांमुळे गणित बदललं


सत्यजीत पाटलांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील अनेक गणितं बदलली. शाहूवाडी, शिराळा या दोन मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. स्वतः फोन उचलणारा, लगेच रिप्लाय देणारा आणि सर्वासमान्य लोकांमध्ये मिसळणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. तसेच मराठा चेहरा असल्याने धैर्यशील मानेंवर नाराज असलेल्या मतदारांना पर्याय मिळाल्याची चर्चा आहॆ . जयंत पाटलांची त्यांच्यामागे उभी असलेली ताकद आणि यंत्रणा ही त्यांची जमेची बाजू आहे. 


उद्धव ठाकरे हे राजू शेट्टी यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडणार होते. पण राजू शेट्टींनी महाविकास आघाडीमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्यांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आणि महाविकास आघाडीकडून बाहेरून पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली. राजू शेट्टींची वाट पाहून उद्धव ठाकरेंनी शेवटी आपला उमेदवार दिला. 


दुसरीकडे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारीच सुरुवातीपासून धोक्यात होती. मतदारसंघामध्ये ठेवलेल्या कमी संपर्कामुळे त्यांच्याविरोधात मोठी नाराजी असल्याचं सागंत भाजपने उमेदवार बदलाची मागणी केली होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटी धैर्यशील मानेंच्या मागेच त्यांची ताकद उभी केली. गेल्या काही दिवसात धैर्यशील मानेंनीही प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आहे. 


मुख्यमंत्री मतदारसंघात तळ ठोकून


कोल्हापूर जिल्ह्यातील दोनही मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. सुरुवातीला या दोन्ही जागा धोक्यात असल्याचा अहवाल भाजपने दिला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंग बांधल्याचं दिसतंय. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक दिवस कोल्हापुरात तळ ठोकला होता. धैर्यशील मानेंवर नाराज असलेल्या अनेक नेत्यांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. 


भाजपकडून 'मोदी कार्ड' बाहेर


कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात भाजपकडून मोदी कार्ड बाहेर काढल्याचं दिसतंय. ही निवडणूक देशाची असून तुमचं मत हे मोदींना द्या असं आवाहन केलं गेलं. धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार केला गेला.


कसं आहे मतदारसंघाचं गणित?


हातकणंगले मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी शाहूवाडी-पन्हाळा, वाळवा आणि शिराळा या तीन मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेचे सत्यजीत पाटील यांना चांगला प्रतिसाद असल्याचं दिसतंय. तर शिरोळ मतदारसंघात राजू शेट्टी यांना अधिकचा प्रतिसाद दिसतोय. इचलकरंजीमध्ये आणि काही प्रमाणात हातकणंगल्यामध्ये धैर्यशील माने आघाडी घेतील असं राजकीय विश्लेषक सांगतात. एकूण परिस्थिती पाहता या ठिकाणी मशालीचा जोर असून सत्यजित पाटील विरूद्ध धैर्यशील माने या दोन शिवसैनिकांमध्येच लढत होईल असंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे.


1. शाहूवाडी - विनय कोरे (जनसुराज्य- भाजपला पाठिंबा)
2. हातकणंगले - राजू आवळे (काँग्रेस)
3. इचलकरंजी - प्रकाश आवाडे (अपक्ष - भाजप समर्थन)
4. शिरोळ - राजेंद्र यड्रावकर (अपक्ष- शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा)
5. इस्लामपूर-वाळवा - जयंत पाटील (राष्ट्रवादी)
6. शिराळा - मानसिंग नाईक (राष्ट्रवादी)


शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हातकणंगलेमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानुभूती असल्याचं चित्र आहे. पण ही सहानुभूती मतपेटीतून व्यक्त होते का हे पाहावं लागेल. 


जयंत पाटलांची प्रतिष्ठा पणाला


हातकणंगले मतदारसंघात वाळवा आणि शिराळा हे सांगलीतील दोन मतदारसंघ येतात. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. जयंत पाटील यांचं या भागात मोठं वर्चस्व आहे. महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीची यंत्रणा सत्यजीत पाटलांसाठी एकजुटीने काम करताना दिसत आहे. जयंत पाटील हे सत्यजीत पाटलांना वाळवा आणि शिराळा या मतदारसंघातून किती लीड देतात यावर बरंच काही अवलंबून आहे. 


एकूणच, सुरूवातीला प्रचारात मागे पडलेल्या आणि नंतर मुसंडी मारलेले सत्यजीत पाटील आणि नाराज असलेल्यांची नाराजी दूर करून कामाला लागलेले धैर्यशील माने या दोन शिवसैनिकांतील लढतीमुळे उद्धव ठाकरेंपासून, एकनाथ शिंदे, जयंत पाटील अशा अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांनी सभा घेतल्याने भाजपनेही जास्तीत जास्त मतदान आपल्याकडे कसं खेचता येईल यावर भर दिला आहे. आता हातकणंगलेकर हे ठाकरेंची मशाल हाती घेतात की शिंदेंचं धनुष्यबाण की राजू शेट्टींची शिट्टी वाजणार हे येत्या 4 जून रोजी समजेल.


ही बातमी वाचा: