Rashmi Thackeray: एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करून नवीन सरकार स्थापन केल्यापासूनच शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये दररोज नवीन संघर्ष होताना दिसत आहे. यातच आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या पक्षात सक्रिय झाल्या आहेत का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. याच प्रश्नच उत्तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे. त्या म्हणतंय आहेत की, ''रश्मी ठाकरे महिला आघाडीत नेहमीच सक्रिय होत्या. आत्ता सहभाग वाढला, असं म्हणणं विरोधकांना पुष्टी दिल्यासारखं होईल. दरवर्षी वहिनी इथं येतात, आरती करतात, भोंडला होतो. प्रत्येक नागरिकाला माहीत आहे की, सेनाभवनमध्ये तुळजाभवानी आहे. चैत्र आणि अश्विन नवरात्रात घट बसतात. वहिनी दरवर्षी येतात आणि खेळांमध्येही सामील होतात, खेळ खेळतात.''
मला तर तीन वेळा जीवे मारण्याची धमकी मिळली: पेडणेकर
आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत की, ''मला तर तीन वेळा धमक्या आल्या. त्यांनाही आल्या असतील, तर पोलिसांनी हे गांभीर्याने घ्यायला हवं. तपास यंत्रणांनी त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे.'' माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, ''बावनकुळेची कुळे आता कळायला लागली आहेत. यांची जीभ सैल झाली आहे. हात तोडेन, पाय तोडेन, महाराष्ट्राला भिकारी करेन. इतक्या जिभा सैल कशा झाल्या यांच्या? अचानक कोणता कॉन्फिडन्स आला? हे त्यांना विचारा.''
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दोन ठिकाणी दसरा मेळावा होत आहे, हे दुर्दैव असल्याचं म्हटलं होत. यावर त्या म्हणाल्या आहेत की, ''आमचं दुर्दैव आहे, की तुम्हाला आम्ही नेते बनवलं. सगळं घशात घातलं तुमच्या. हे आमचंच दुर्दैव आहे.'' उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार मांडू शकत नाही, असं देखील आठवले म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देत पेडणेकर म्हणल्या की, ''हे स्वतःच्या बापाचं नाव कुठे लावत नाही. कारण त्यांच्या बापाच्या नावाने काही मिळत नाही. जे काही मिळवलं, ते उद्धव ठाकरे यांच्या बापाच्या नावाने मिळवलं आणि आता त्यांनाच बोलतायत.''
भाजप आमदार आशिष शेलार यांनी भारत जोडो यात्रेला पेंग्विन सेनेची साथ, दसरा मेळावा भरण्यासाठी कॉंग्रेस देणार साथ, अशी टीका केली होती. यावर त्या म्हणाल्या आहेत की, ''तुम्ही कोणाकोणाला साथ दिली काश्मीरपासून ते आत्तापर्यंत? प्रवीण तोगडिया यांचं भाषण ऐका, तोगडिया म्हणतायत काँग्रेसमध्ये लढू नका भाजपमध्ये जा. पद मिळतील असं ते म्हणतायत.'' मिलिंद नार्वेकर पण शिंदे गटात जाणार? या प्रश्नाला उत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ''मिलिंद जाणारच नाही, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
अलीकडेच शिवसेना पक्षाच्या होर्डिंगवर रश्मी ठाकरेंचा फोटो झळकू लागला आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारलं असता त्या म्हणाल्या की, ''ही ज्याच्या त्याच्या प्रेमाची भाषा आहे. होर्डिंग पक्ष बनवत नाही, तर कार्यकर्ते बनवत असतात. अनेक पक्षांच्या होर्डिंगमध्ये वेगवेगळे चेहरे दिसतात. म्हणजे कालपर्यंत तुझं माझं जमेना आणि आज गळ्यात गळे. तिथे का प्रश्न उपस्थित होत नाही? रश्मी वहिनी शिवसेनेच्या महिला आघाडीत सक्रिय आहेत, हे लक्षात ठेवा.''