छत्रपती संभाजीनगर: आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बीड मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बीडमध्ये महायुतीने भाजपच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना रिंगणात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बीड लोकसभेची (Beed Loksabha) लढाई या दोन नेत्यांमध्येच होईल, असा अंदाज होता. परंतु, आता बीड लोकसभेच्या रिंगणात आणखी एक तगडा उमेदवार उतरण्याची शक्यता आहे. 


वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेतून शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. ज्योती मेटे या शरद पवार गटाकडून लढण्यासाठी इच्छूक होत्या. मात्र, शरद पवार गटाने बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देऊ केली. त्यामुळे ज्योती मेटे काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर ज्योती मेटे या आता वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेची निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. याविषयी ज्योती मेटे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला.


ज्योती मेटे यांनी बीड लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबत शिवसंग्राम पक्षाच्या नेत्यांची चर्चा सुरु आहे. वंचितकडून लढण्याच्याबाबतीच जी चर्चा सुरु आहे, त्याबद्दल मी लवकरच सविस्तर बोलेन. मात्र, मी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. शिवसंग्राम संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन मी निर्णय जाहीर करेन, असे ज्योती मेटे यांनी सांगितले. 


ज्योती मेटे यांची उमेदवारी ठरणार गेमचेंजर?


मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र मराठवाड्यात होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या भागात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मराठा उमेदवाराला पाठिंबा मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे बीडमध्ये ज्योती मेटे यांच्यासारखा मराठा उमेदवार प्रभावी ठरु शकतो. वंचितने ज्योती मेटे यांना उमेदवारी दिल्यास दलित-मराठा कॉम्बिनेशनमुळे बीड मतदारसंघात त्यांना चांगली मते पडू शकतात.


आणखी वाचा 


बजरंग सोनवणेंना उमेदवारी, ज्योती मेटेंचा पत्ता कट; पंकजा मुंडे म्हणतात...