Govinda Net Worth : बॉलिवूड (Bollywood) आणि राजकारणाचा (Politics) संबंध फार जुना आहे. अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपली छाप सोडली. तर, काहींना राजकारणातील वातावरण मानवले नाही. बॉलिवूडमधला 'हिरो नंबर 1' असलेल्या गोविंदाचा राजकीय प्रवेशही असाच अचानक झाला होता. जवळपास 14 वर्षानंतर आता गोविंदा (Govinda) पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात उतरला आहे.
गोविंदाने राजकारणात येण्यासाठी आपले बॉलिवूड करिअर बाजूला ठेवले होते. खासदार झाल्यानंतर त्याने 2006 च्या सुमारास सिनेसृष्टीत पुनरागमन केले होते. मात्र, मागील काही वर्षात गोविंदाची भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तरिही गोविंदा दरवर्षी करोडोंची कमाई करतो.
'इल्झाम' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश करणाऱ्या गोविंदाने आपल्या कसदार अभिनयाने, दमदार नृत्याने आणि कॉमेडीच्या टायमिंगने आपल्या चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. मागील काही वर्षात गोविंदाचे स्टारडम कमी झाले.पण, एक काळ असा होता की त्याच्याकडे चित्रपटांची रांग होती. गोविंदा त्या काळात भरपूर कमाई करत असे. अनेक ब्रँड एंडोर्समेंटमधूनही त्याने भरपूर कमाई केली आहे.
गोविंदाचाही आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास 16 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बंगल्याशिवाय त्यांचा जुहूमध्ये एक बंगला आणि मड आयलंडमध्ये एक बंगला आहे. याशिवाय, त्याने अनेक रिअल इस्टेट मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यातून त्याला चांगले उत्पन्न मिळते. गोविंदाचे कार कलेक्शनही खूपच अप्रतिम आहे. त्याच्याकडे फोर्ड एंडेव्हर आणि मित्सुबिशी लान्सरसह इतर अनेक लक्झरी कार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदांच्या उत्पन्नाचा स्रोत हा ब्रँड एंडोर्समेंट आहे. यातून चांगली कमाई होते. गोविंदा यातून दरवर्षी 16 कोटी रुपये कमावतो. गोविंदाचा काही व्यवसाय असून त्यातून तो करोडोंची कमाई करतो, अशीही चर्चा आहे. मात्र, त्याच्या व्यवसायाबाबत माध्यमांमध्ये फारशी माहिती नाही. पण तो अनेक रिॲलिटी शोमध्ये पाहुणा म्हणून दिसतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदाची संपत्ती ही 170 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जाते.
2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी
अभिनेता गोविंदा याने मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्याने तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा पराभव केला. 2004 च्या निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघात विरारपर्यंतचा भाग येत असे. गोविंदा याने राम नाईक यांचा जवळपास 50 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला.