Nashik Lok Sabha Constituency : बुधवारी शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) 17 उमेदवारांच्या यादीची घोषणा करण्यात आली. या यादीत नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Vaje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणूक लढवणारच, असा निर्धारही करंजकर यांनी केला.
आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विजय करंजकर यांनी हजेरी लावल्याने ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून सकल मराठा समाजाचे उमेदवार असणार का? अशी चर्चा आता रंगत आहे.
सामाजिक बांधिलकीतून बैठकीला आलो - विजय करंजकर
या पार्श्वभूमीवर विजय करंजकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, समाजाने एकरूप राहून काम करावे. काही पदाधिकाऱ्यांचे मला फोन आलेत. मी प्रत्येक बैठकीला आलो होतो. त्यामुळे आजच्या बैठकीलाही उपस्थित राहिलो. आजची कुठल्या पार्श्वभूमीवर होती, याबाबत मला माहित नव्हते. सामाजिक बांधिलकीतून या बैठकीला आलो आहे. मी इथे उमेदवारी मागायला आलो नाही. मी एका पक्षाशी बांधील आहे.
विजय करंजकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट
मला बोलावले आहे. मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटण्यासाठी जाणार आहे. मी काही मागायला जात नाही. कधी कोणाकडे मागत नाही. जे काही मागितले ते माझ्या पक्षप्रमुखांकडे मागितले. त्यांची इच्छा झाली नाही मी पुढे बघेल काय ते? उद्धव साहेबांशीच मी बोलतो. आणखी कोणाशी बोलत नाही. दोघांमध्ये बोलणे होते, प्रत्येक गोष्टीवर बोलणं होत. मी साहेबांना मानतो. मला परवा वेळ दिली आहे. त्यामुळे मी तेव्हा जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
भुजबळांविरोधात सकल मराठा समाज उमेदवार देणार
दरम्यान, नाशिकमधून महायुतीतून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) लोकसभा निवडणुक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे सकल मराठा समाज निवणुकीच्या रिंगणात आपला उमेदवार देणार आहे. बैठकीत नाशिक लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवाराची चाचपणी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे बांधव भगिनी या बैठकीला उपस्थित होता. या बैठकीचा अहवाल मनोज जरांगे पाटलांना पाठवला जाणार आहे.
आणखी वाचा