Lok Sabha Election 2024 : 'भाजपच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी भंडाऱ्यात काँग्रेसचा डमी उमेदवार (Congress Dummy Candidate) देण्यात आला असून, पैसे घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडून उमेदवारी दिली जातेय' असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा आरोप काँग्रेसच्या माजी आमदारानेच केल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये (EX Congress MLA Sevak Waghaye) यांनी हा आरोप केला असून, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून (Bhandara-Gondia Lok Sabha Constituency) लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते. पण, त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज असल्याची माहिती मिळत आहे.
नाना पटोले यांच्यावर आरोप करतांना सेवक वाघाये म्हणाले की, “भंडारा-गोंदियाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नातेवाईक आहे. त्यांना जिंकविण्यासाठीच काँग्रेसनं भंडाऱ्यात डमी उमेदवार दिला. लोकसभेत भाजप जिंकणार आणि त्या बदल्यात साकोली विधानसभेचा नाना पटोले यांचा मार्ग मोकळा होईल. उमेदवारी देत असताना पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा घणाघात आरोप" सेवक वाघाये यांनी नाना पटोले यांच्यावर लावला आहे.
सेवक वाघाये यांचं शेवटच्या दिवशी नामांकन
काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र, काँग्रेस पक्षानं डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं नाराज असलेल्या सेवक वाघाये यांनी काल उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नामांकन दाखल केलं. याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
लोकसभेचं तिकीट विकल्याचा आरोप
'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना सेवक वाघाये म्हणाले की, “मी लोकसभा लढावी अशी जनतेची मागणी असल्याने उमेदवारी दाखल केली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारानं केवळ दोन हजार मते मिळविली आणि अशाला काँग्रेसनं लोकसभेची उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचा उमेदवार ज्यानं कधीही काँग्रेसचा पंजा हातात घेतला नाही, बॅनर पोस्टर हातात घेतली नाही, अशाला तिकीट देण्यात आले. भंडारा आणि गडचिरोली लोकसभेची तिकीट विकल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसमधील नेते पक्ष सोडून जात आहेत. गोंदियाच्या माणसाला गडचिरोलीची उमेदवारी दिली. पैसे देऊन उमेदवारी देणे हा चुकीचा कार्यक्रम असल्याचे सेवक वाघाये म्हणाले.
माझ्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करेल : सेवक वाघाये
यापूर्वी नाना पटोलेंनी सुधाकर गणगणेंना पाडल्यानेचं विलासरावांनी नानाला पक्षातून काढले होते. दहा वर्षानंतर भाजपातून काँग्रेसमध्ये आल्यानंतर राहुल गांधी, सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातील राजकारणाची माहिती नसल्यानं त्याचा फायदा घेऊन हे काँग्रेसमध्ये काम करीत आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी एआयसीसीच्या बैठकीत जो उमेदवार 2014 च्या निवडणुकीत केवळ 2100 मते घेऊन पराभूत झाला, अशा डॉ. पडोळेच्या उमेदवारीबाबत चर्चा निघाली. आम्ही पक्ष उभा केला, नानांमुळे पक्ष संपायला लागला आहे. माझ्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करेल. शक्य झाल्यास काँग्रेस वाचवण्यासाठी माझी उमेदवारी कायम राहील, असेही सेवक वाघाये म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
खिचडी चोर अमोल किर्तीकर यांचा प्रचार करणार नाही, काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी शड्डू ठोकला