One Mla One Pension Punjab: पंजाबमध्ये एकापेक्षा जास्त पेन्शन देणारा अनेक दशके जुना कायदा संपुष्टात आला असून राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी 'एक आमदार, एक पेन्शन' कायद्याला मंजुरी दिली आहे. पंजाबमध्ये मान सरकारने मंजूर केलेल्या विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
म्हणजेच आतापासून माजी आमदारांना केवळ एका टर्मसाठी पेन्शन मिळणार आहे. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, 'मला पंजाबी लोकांना कळवताना अतिशय आनंद होत आहे की राज्यपालांनी "एक आमदार - एक पेन्शन' विधेयक मंजूर केले आहे. अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेच्या करात मोठी बचत होणार आहे.
250 माजी आमदार पेन्शन सेवेचा लाभ घेत आहेत
एक टर्म पूर्ण केल्यानंतर कोणत्याही आमदाराला 75 हजार रुपये पेन्शन मिळते. यानंतर त्या 75 हजारांव्यतिरिक्त, पुढील कार्यकाळासाठी 66 टक्के पेन्शनची रक्कम मिळते. या विधेयकापूर्वी एखादा आमदार पाच वेळा निवडणूक जिंकल्यास त्याला पाच वेळा पेन्शन सेवेचा लाभ मिळू शकतो, असा नियम होता. सध्या सुमारे 250 माजी आमदार पेन्शन सेवेचा लाभ घेत आहेत. त्याचबरोबर एक आमदार, एक पेन्शन कायदा लागू झाल्यानंतर आतापासून एका आमदाराला एकच पेन्शन मिळणार आहे.
नव्या नियमानुसार आता माजी आमदार म्हणून प्रत्येक व्यक्तीला दरमहा 60 हजार पेन्शन मिळणार आहे. यासोबतच कितीही वेळा आमदार झाले तरी महागाई भत्ताही दिला जाईल. सदस्य म्हणून काम करताना जर एखाद्या व्यक्तीचे वय 65 वर्षे, 75 वर्षे आणि 80 वर्षे पूर्ण झाले, तर त्याला सुरुवातीच्या पेन्शनमध्ये अनुक्रमे 5 टक्के, 10 टक्के आणि 15 टक्के वाढ मिळणार.
महाराष्ट्रातील आमदारांना किती आहे पेन्शन?
महाराष्ट्रात आमदारांना एका टर्मसाठी 50 हजार रुपये पेन्शन दिली जाते. तसेच त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी आमदार राहिल्यास दोन हजार रुपये वर्ष याप्रमाणे वाढ दिली जाते. म्हणजेच प्रत्येक टर्ममध्ये दहा हजार रुपयांची वाढ होते.
इतर महत्वाची बातमी:
Kargil Vijay Din : पंजाब सरकारचा मोठा निर्णय, शहीद जवानांच्या कुटुंबाला मिळणार एक कोटी रूपये
पंजाब सरकारनं करून दाखवलं, महिन्याला 300 युनिट मोफत वीज देण्याचे परिपत्रक जारी