नागपूरः पक्षाकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता मिळालेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे नेते म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची ओळख आहे. राज्यात भाजपा विरोधात असतानाही अर्थमंत्र्यांकडून गेल्या टर्ममध्ये उर्जामंत्री म्हणून बावनकुळेंनी केलेल्या कामांची स्तुती व्हायची. प्रस्ताव तर कोणीही तयार करतो मात्र त्याला बजेटमध्ये कसे आणायचे हे त्यांच्याकडून शिका अशी त्यांची ओळख आहे. बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड ही प्रत्येक विदर्भवासियासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
फडणवीस म्हणाले, उर्जा खात्यात काम करत असताना त्यांनी अनेक रिफॉर्म केले. राज्याची वीज निर्मितीचा खर्च अधिक होता. त्यावर अभ्यास केला. वीज निर्मिती खर्च कमी केले आणि लोकांना महागाईची झळ लागू दिली नाही. उर्जा क्षेत्रातील तिन्ही तोट्यात असलेल्या कंपन्या त्यांनी नफ्यात आणल्या. एकदा काम हाती घेतलं की ते पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग सोडत नाही हा त्यांचा गुणधर्म आहे. त्यांच्या गावोगावी असलेल्या कनेक्टमुळे त्यांचा वेगळा चाहतावर्ग आहे.
32 मतदार संघ पिंजून काढले
पक्षाने बावनकुळेंना कधीच दुर्लक्षित केले नाही. तर त्यांच्यावर मोठी जबाबदारी येणार हे आम्हाला माहिती होते. पक्षाचे आदेश स्विकारून त्यांनी 32 मतदार संघ पिंजून काढले आणि पक्षकार्य त्यांनी केले. त्यांची किंमत पक्षाला माहिती असून आज ते राज्यभर पक्षविस्ताराचे काम करणार आहे. राज्याचा कारभार सांभाळत असताना बावनकुळेंसारखा अभ्यासून आणि चिकाटीने काम करणारा सहकारी मिळणे हे माझ्यासाठीच नव्हे तर प्रत्येकासाठी सौभाग्याची बाब असल्याचा विश्वास यावेळी फडणवीसांनी अधोरेखित केले.
Azadi Ka Amrit Mahotsav : आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक तिरंगा हा प्रत्येक घरावर लागलाच पाहिजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरकरांना आवाहन
सत्कार सहोळ्यापूर्वी तिरंगा रॅली
सत्कार सोहळ्यापूर्वी नागपुरातील त्रिशरण चौक ते शताब्दी चौकापर्यंत आज काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला. यामध्ये केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नागपूर शहर भाजपाध्यक्ष आमदार प्रविण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आमदार मोहन मते, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार गिरीश व्यास, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर यांच्यासह शहर, जिल्हा भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळेतील हजारो विद्यार्थी उपस्थित होते.