मुंबई : भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी मला पक्षात पुन्हा प्रवेश करण्याविषयी विचारले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेशही झाला होता. मात्र, यानंतर भाजपने (BJP) त्याबाबत घोषणा केलीच नाही. आता भाजपच्या पक्ष प्रवेशावर आता फुली मारल्याचे वक्तव्य ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी माझा कट्ट्यावर केले होते. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी विरोध केल्याने माझा पक्ष प्रवेश झाला नसल्याचेदेखील काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. आता यावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर एबीपी माझा कट्ट्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला तुमचा विरोध होता का? असे विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, मी याबाबत नड्डा जी किंवा अमित शाह यांच्याशी बोललो नाही. त्यांनी किती वेळा दिल्लीला लोटांगण घातले हे तुम्हीच बघितले आहे. त्यांचे दिल्लीतील फोटो किती वेळा बाहेर आले? ते दिल्लीला गेले, मला पक्षात घ्या म्हणत पण पक्षाला गरज नाही. तुम्ही एकदा सोडून गेले, पक्षाला एवढा शिवीगाळ केला. देवेंद्रजींबद्दल इतके अभद्र बोलले. आम्हाला गरज नाही.
सुनेच्या तिकिटासाठी दिल्लीला लोटांगण घातले
तुम्ही तिथे लोटांगण घालायचे आणि परत सांगायचे मला तिथे बोलावले होते. हा कुठला प्रकार आहे? सुनेच्या तिकिटासाठी दिल्लीला लोटांगण घातले. मी पुन्हा पक्षात येतो जे झालं ते विसरून जा हे त्यांनीच केलं. माझा काही रक्षा खडसेंना विरोध नव्हता. मी एक शब्द पण रक्षा खडसेंना तिकीट देऊ नका असे बोललो नाही. मला बोलायचं असतं तर मी बोललो असतो. मला बोलण्यासाठी काही कठीण पण नव्हते. पण मी बोललो नाही कारण तिचे काम चांगले आहे. रक्षा खडसेंना तिकीट मिळावे म्हणून एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार होते का? असे विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, तिकिटासाठी काय, त्यांचे सगळे पाप झाकण्यासाठी काय, 137 कोटींचा प्रकरण दाबण्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण त्यात त्यांना कोणीच वाचवू शकत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा