मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2024)11 जागांसाठी मतदान होणार आहे. अकरा जागांसाठी  12 उमेदवार रिंगणात असल्यानं एका एका आमदाराचं मत महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोठी खेळी केली आहे. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) तुरुंगात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. गणपत गायकवाड यांना मतदानापासून रोखावं, असं काँग्रेसनं पत्र लिहिलं आहे. एक एक मत जुळवण्यासाठी प्रयत्न सुरु असताना काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पत्र लिहून गणपत गायकवाड यांना मतदानापासून रोखावं, असं पत्र लिहिलं आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) रुग्णालयात आहेत. शहाजीबापू पाटील हे आजारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहाजीबापू पाटील मतदानाला येणार का? ते आले तर या मताचा फायदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होऊ शकतो.

  


काँग्रेसचा गणपत गायकवाड यांच्या मतदानावर आक्षेप


भाजपचे आमदार गणपत गायकवाड सध्या पोलीस स्टेशनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला होता. त्यामुळं गणपत गायकवाड अटकेत आहेत. आज विधानपरिषद निवडणुकीत त्यांना मतदान करु देऊ नये, असं पत्र काँग्रेसनं लिहिलं आहे.  महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारानंतर  गणपत गायकवाड अटकेत आहेत. 


लोकप्रतिनिधी कायद्यानुसार गणपत गायकवाड यांना मतदान करता येणार नाही, असं काँग्रेसनं म्हटलं आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करुन देऊ नका, अशी मागणी काँग्रेसच्यावतीनं करण्यात आली आहे.  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जो न्याय अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना लावण्यात आला त्या प्रमाणं यावेळी देखील भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करु देऊ नका अशी मागणी केली जात आहे.  काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांच्यावतीनं हा आक्षेप घेण्यात आला आहे.


विधान परिषद निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचं  


विधानसभेतील आमदारांमधून विधानपरिषदेवर 11 आमदार निवडून द्यायचे आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या 274 आमदार आहेत. त्यामुळं विधानसभेच्या आमदाराच्या एका एका मताला महत्त्व प्राप्त झालं आहे. या निवडणुकीत विजयी उमेदवाराचा कोटा 23 इतका निश्चित करण्यात आला आहे. 


गणपत गयाकवाड यांना मतदानाला नेण्यासाठी पोलीस निघालेले आहेत. काँग्रेसनं याच पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहेत. पोलीस गणपत गायकवाड यांना तळोजा तुरुंगातून मतदान करण्यासाठी घेऊन निघाले आहेत. गणपत गायकवाड यांच्या मतदानासाठी कोर्टाकडून परवानगी घेतली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. गणपत गायकवाड पुढच्या तासाभरात ते मतदानासाठी येतील आणि मतदान करतील, अशी शक्यता आहे. 


निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार गणपत गायकवाड यांचं जर मतदान यादीत नाव असेल तर त्यांना मतदान करता येईल. गणपत गायकवाड यांची आमदारकी रद्द झालेली नाही किंवा कोर्टाने अद्याप सजा सुनावलेली नाही.त्यामुळे त्यांना मतदान करता येईल .तरीही राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार असल्याची माहिती आहे.


विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार


भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत 
शिवसेना : भावना गवळी, कृपाल तुमाणे 
राष्ट्रवादी काँग्रेस : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर 
काँग्रेस : प्रज्ञा सातव
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पुरस्कृत : जयंत पाटील
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : मिलिंद नार्वेकर   



संबंधित बातम्या :


विधानपरिषदेत कुणाचे वाजणार 'बारा', किचकट राजकीय गणितात कोण कुणाला शह देणार? आज फैसला